Kolhapur Mills Closure : घटत्या कमाईने व्यवसायालाच ग्रहण: काहींनी गिरणी केल्या बंद; खर्चाच्या गणिताचा ताळमेळ बसविण्याचेही आव्हान
esakal January 20, 2025 10:45 PM

- संदीप खांडेकर

कोल्हापूर : स्मार्ट वीज मीटर बसविल्यानंतर वीज बिल किती येणार, याचा उलगडा न झाल्याने गिरणी मालक अस्वस्थ आहेत. घटत्या कमाईचे ग्रहण व्यवसायाला लागत असल्याने काहींनी थेट या व्यवसायाला रामराम ठोकला आहे. पिठाचे बारीक कण श्वासावाटे आत गेल्यानंतर श्वसनाच्या आजारांसाठी खर्चाच्या गणिताचा ताळमेळ कसा बसवणार, हा त्यांच्यासमोरील प्रश्न आहे. त्यातही कुशल कारागिरांचा तुटवडा असल्याने गिरणीमालक अक्षरश: वैतागले आहेत.

महावितरणकडून स्मार्ट वीज मीटर बसविण्याची मोहीम सर्वत्र सुरू आहे. औद्योगिक दराने वीजपुरवठा गिरणींना होत असल्याने त्याचे बिल भरताना मालकांच्या खिशाला कात्री बसते. स्मार्ट वीज मीटरनंतर बिल किती येईल, याचा त्यांना अंदाज नाही.

परिणामी त्यांच्याकडून स्मार्ट मीटरला विरोध होत आहे. त्यातही महावितरण वीजपुरवठ्यात सवलत द्यायला तयार नसल्याचे मालकांचे मत आहे. ज्यांना पिढीजात व्यवसाय केवळ टिकवायचा आहे, ते या व्यवसायात ना नफा ना तोटा तत्त्वावर तळ ठोकून आहेत. केवळ उदरनिर्वाहापुरती का असेना कमाई होते, याचे त्यांना समाधान आहे.

ज्यांची मुले उच्च शिक्षित झाली, त्यांनी मात्र हा व्यवसाय बंद केला आहे. सातत्याने गिरणीत थांबल्याने पीठाचे बारीक कण शरीरात जाऊन श्वसनांच्या आजाराचे दुखणे मागे नको, असेही काही जणांना वाटते.

अलीकडच्या काळात श्वसानाचे आजार होऊ नयेत, यासाठी काही गिरणीत पंचवीस हजार रुपये खर्च करून डस्ट कलेक्टर बसविले आहेत. गिरणीत काही तांत्रिक बिघाड झाला तर तो दुरुस्त करण्यासाठी कुशल कारागीर मिळत नाही. हे या व्यवसायासमोरील मोठे आव्हान बनले आहे. परिणामी त्यासाठी गिरण किती दिवस बंद ठेवायची, असाही प्रश्न आकाराला आला आहे.

संसारसेटमध्ये घरगुती चक्की भेट...

विवाह सोहळ्यात संसार सेटमध्ये थेट घरगुती चक्की भेट दिली जात आहे. मात्र, तिचा वापर केवळ घरगुती न होता व्यावसायिकदृष्ट्या होत आहे. त्यावर कोल्हापूर जिल्हा दळप-कांडप गिरणीमालक संघटनेचा आक्षेप आहे.

व्यावसायिकदृष्ट्या वापरात असलेल्या घरगुती चक्क्यांची चौकशी होणे आवश्यक आहे. जर तसा वापर होत असेल तर त्यांच्याकडून औद्योगिक दराने बिल वसूल करणे, ही महावितरणची जबाबदारी आहे. त्यांनी तातडीने एक पथक नेमून चक्क्यांचा शोध घ्यावा.

-शशिकांत नलवडे, गिरणीमालक, संध्यामठ गल्ली

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.