IND vs ENG : टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये धमाकेदार विजय, इंग्लंडवर 79 धावांनी मात
GH News January 21, 2025 08:12 PM

भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने इतिहास घडवला आहे. टीम इंडियाने टी 20 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियाने विक्रांत केणी याच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात इंग्लंडचा 79 धावांनी धुव्वा उडवला आणि ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यात यश मिळवलं आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 198 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी इंग्लंडला 19.2 ओव्हरमध्ये 118 धावांवर गुंडाळलं. टीम इंडियाने अशाप्रकारे या सामन्यासह चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.

टीम इंडियाची बॅटिंग

योगेंदर भरोदिया आणि माजिद मरग्रे या दोघांनी केलेल्या विस्फोटक खेळीच्या जोरावर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 197 धावा केल्या. योगेंदर भरोदियाने 40 बॉलमध्ये 73 रन्स केल्या. तर माजिद मरग्रे याने 19 चेंडूत 33 धावांची झंझावाती आणि नाबाद खेळी केली. तर इंग्लंडकडून ए हॅमंड याने 4 ओव्हरमध्ये 30 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

तर फलंदाजांनंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आणि इंग्लंडला 4 बॉलआधी ऑलआऊट करुन विजय मिळवला. इंग्लंडचं 118 रन्सवर पॅकअप झालं. इंग्लंडसाठी ए हॅमंड याने सर्वाधिक धावा केल्या. हॅमंडने 35 बॉलमध्ये 35 धावा केल्या. तर टीम इंडियाकडून राधिका प्रसाद याने 19 धावांच्या मोबदल्यात सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : विक्रांत केणी (कर्णधार), रवींद्र संते (उपकर्णधार), योगेंदर भरोदिया, आकाश पाटील, राजेश कन्नूर, नरेंद्र मंगोरे, जितेंद्र व्हीएन, सन्नी गोयत, निखील मनहास, माजिद मरग्रे आणि राधिका प्रसाद

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.