Karad : शॉर्टसर्किटमुळे २० एकरांतील उसाला आग; नुकसानीमुळे ३४ शेतकऱ्यांच्या डाेळ्यात आले पाणी
esakal January 22, 2025 04:45 PM

कऱ्हाड : कालेटेक परिसरातील नारायणवाडी येथे गावंदर नावाच्या शिवारात दुपारी दोनच्या सुमारास शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत सुमारे २० एकरांतील ऊस जळून खाक झाला. त्यामुळे विभागातील ३४ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. कालेटेक व नारायणवाडी दोन्ही गावांना जोडणारा गावंदर परिसर आहे.

परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस उभा आहे. ऊस कारखान्याच्या तोडीच्या प्रतीक्षेत आहे. महावितरणचे भारनियमन व अन्य कामासाठी वीज ट्रीप झाली. त्यावेळी परिसरातील डीपीवर पक्षी बसला होता. विजेचा प्रवाह वेगात आल्याने पक्ष्याचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. त्यादरम्यान पडलेल्या ठिणग्यांमुळे परिसरातील उसाला आग लागली.

आगीने रौद्ररूप धारण केले. परिसरातील सुमारे २० एकरांतील ३४ शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला. परिसरातील अनेक शेतकरी आकाशात धुराचे व आगीचे लोट पाहताच घटनास्थळी धावले. शर्थीचे प्रयत्न केल्याने नुकसान टळले.

त्यामुळे परिसरातील पुढचा ३० एकरांतील ऊस आगीपासून बचावला. आगीची माहिती मिळताच कृष्णा कारखान्याचे गट अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. नुकसानीची पाहणी केली. महावितरण विभागाचे अधिकारीही तेथे आले होते. कालेचे तलाठी सचिन धवन व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले. जळालेला ऊस तातडीने कारखान्याने तोडून नेण्याची मागणी जळीतग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. जळीत उसाची कारखान्याने कोणतीही कपात करू नये, अशीही शेतकऱ्यांची मागणी आहे.

शेतकऱ्यांना अश्रू अनावर

आगीच्या घटनेनंतर परिसरात धुराचे लोट व आगीतून बाहेर पडणारी काळी राख परिसरातील अनेक गावांत पसरली होती, त्यामुळे आगीची चर्चा सर्वत्र होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडचा घास आगीत भस्म झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते. परिसरातील विजेच्या तारा ऊस क्षेत्रातूनच जात आहेत, त्यांची पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.