सातारा : विधानसभा निवडणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना राज्यात दोन नंबरचे मताधिक्य मिळाले आहे. ज्या जिल्ह्यात सर्वाधिक आमदार, त्या पक्षाचा पालकमंत्री असा नियम राज्यात सगळीकडे असताना साताऱ्यात हा नियम लागू न करता शंभूराज देसाईंना पालकमंत्री केले.
शिवेंद्रसिंहराजे हे सर्वसमावेश नेतृत्व असल्याने गादीचा मान राखून सध्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती द्यावी. भारतीय जनता पक्षाने २६ जानेवारीला ध्वजवंदनाचा मान पालकमंत्री म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनाच द्यावा, अन्यथा उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
साळुंखे म्हणाल्या, ‘‘पालकमंत्रिपदाची नावे जाहीर झाल्यानंतर रायगड व नाशिक जिल्ह्यात दबाव वाढल्याने पालकमंत्री पदाला स्थगिती दिली आहे. मात्र, साताऱ्यात जनसामान्यांच्या मनात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव पालकमंत्री पदासाठी असताना दुसऱ्याचे नाव जाहीर झाले. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात नाराजीचा सूर उमटला आहे. पालकमंत्री म्हणून साताऱ्यात अनेकांनी काम केले आहे. मात्र, कधीही कुणावर दबाव टाकून राजकारण केले नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून सातारकरांची नाळ राजघराण्याशी जुळल्याने पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे यांना करावे, ही आमची पहिल्यापासून मागणी होती. याबाबत शिवेंद्रसिंहराजे सर्वसामान्यांचे नेतृत्व असल्याने वरिष्ठ स्तरावर निर्णय बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.’’ दरम्यान, भाजपच्या वरिष्ठ पातळीवर आमच्या मागणीचा विचार न झाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही कुणाच्या मागे उभे राहायचे, याचा विचार करू, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
शंभूराज देसाईंच्या निवडीने निरुत्साहपालकमंत्री शंभूराज देसाईंच्या निवडीने सातारा जिल्ह्यात कुठेही उत्साह दिसून आला नाही. यावरूनच साताऱ्याची जनता नाराज असल्याचे दिसून येते. सातारकरांच्या मनात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे पालकमंत्रिपदासाठी नाव असल्याने भाजपने सध्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देऊन साताऱ्यावर झालेला अन्याय दूर करावा व सन्मानाने शिवेंद्रसिंहराजे यांना पालकमंत्रिपदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणीही साळुंखे यांनी केली.