Nana Patole : सध्याच्या सरकारमधील मंत्रीमंडळ हे डाग लागलेले मंत्रीमंडळ
esakal January 23, 2025 04:45 AM

पुणे - 'विद्यमान सरकारच्या मंत्रीमंडळात डाग लागलेले मंत्री आहेत. ६५ टक्के मंत्र्यांवर खुन, भ्रष्टाचारासह वेगवेगळे आरोप आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदारच, त्यांच्या मंत्र्यांवर आरोप करत आहेत, ते केवळ आरोप नाहीत तर वस्तुस्थिती आहे. सरकारला जनाची नसेल, तर मनाची लाज बाळगुन सरकारने डाग लागलेल्या मंत्र्यांचे राजीनामे तत्काळ घ्यावेत.' अशी टिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी राज्य सरकारवर केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मोदीबाग येथील निवासस्थानी पटोले यांनी मंगळवारी भेट घेतली. यावेळी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, अजित दरेकर आदी उपस्थित होते. पवार यांच्यासमवेतच्या भेटीमागील कारण सांगताना पटोले म्हणाले, "विधीमंडळाच्या समित्यांबाबतची माहिती विधानसभा अध्यक्षांना द्यायची आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या नावाचीही चर्चा करुन द्यायची होती. पवार यांची प्रकृती बरी नसल्याचे समजले, त्यामुळे त्यांची भेट घेतली.'

राज्य सरकारकडुन शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा केले जात होते, त्या योजनेमध्ये तत्कालीन कृषीमंत्र्यांनी बदल केले.

हे बदल नेमके कशासाठी केले? कॅबिनेटने त्यास का मान्यता दिली? असे प्रश्न उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारले आहेत. शेतकऱ्यांच्या टाळुवरचे लोणी खाण्याचे काम सरकारने केले आहे. कृषी साहित्य किंमतीपेक्षा चार पट जादा दराने घेऊन त्यामध्ये भ्रष्टाचार करण्यात आला होता. त्यावेळच्या आयुक्तांनी त्यास विरोध केल्यामुळे त्यांचीही बदली करण्यात आली होती. एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत आहे, तर दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांच्या योजनांमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरु आहे.'

प्रदेशाध्यक्षपदासह पक्षात लवकरच मोठे फेरबदल होणार

आमच्या पक्षात लोकशाही आहे, माझ्या प्रदेशाध्यक्षपदाला चार वर्षे पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे माझ्या जागी दुसरा बदल करावा, याबाबत मी स्वतः पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र दिलेले आहे. पक्षात संघटनात्मक बदल करण्याचे अधिकार हायकमांडच्या हातात आहेत, त्यादृष्टीने येत्या काळात पक्षात मोठे फेरबदल होतील, असे पटोले यांनी स्पष्ट केले.

पटोले म्हणाले,

- महायुतीमध्येच सध्या बिहार सुरु झाला आहे.

- ३० दिवसात ओबीसी आरक्षणाचा तिढा सोडविण्याचे आश्वासन दिले, आता ३ वर्षे उलटली

- मंत्रीमंडळाच्या शपथविधीनंतर एक हजार कोटीची निनावी मालमत्ता मिळते

- महाविकास आघाडीमध्ये कोणताही दुरावा नाही

- मंत्र्यांच्या तोंडी आमदार विकत घेणे, पक्ष फोडण्याची भाषा अशोभनीय

- मंत्रीमंडळात बेईमानेने आलेल्या मानसिकतेच्या व्यक्ती

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.