India vs England 1st T20I: भारत आणि इंग्लंड संघात टी२० मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. कोलकातामधील ईडन गार्डन्सवर होत असलेल्या या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली असून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर भारताकडून सुरुवातही चांगली झाली आहे.
प्रथम फलंदाजी करणाऱ्यासंघाकडून फिल सॉल्ट आणि बेन डकेट यांनी डावाची सुरुवात केली. सॉल्ट आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत असल्याने त्याला या मैदानावर खेळण्याचा चांगला अनुभव आहे.
मात्र, या सामन्यात त्याला या अनुभवाचा फायदा घेता आला नाही. त्याला पहिल्याच षटकात भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने त्याला बाद केले. त्याचा झेल संजू सॅमसनने पकडला.
त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार जॉस बटलरने आक्रमक फटके मारले. मात्र, त्यानंतर तिसऱ्या षटकात पुन्हा अर्शदीप सिंग गोलंदाजीला आला. त्याने या षटकातही चांगली गोलंदाजी केली. पण त्याला चौथ्या चेंडूवर बेन डकेटने चौकार ठोकला.
परंतु, त्याच्या पुढच्याच चेंडूवर डकेटला अर्शदीपने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याचा झेल ४ धावांवर रिंकु सिंगने घेतला. या विकेटसह अर्शदीप भारताचा सर्वात यशस्वी टी२० गोलंदाज झाला आहे.
चहलचा विक्रम टाकला मागेतो आता युजवेंद्र चहलला मागे टाकून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आता ६१ सामन्यांमध्ये ९७ विकेट्स झाल्या आहेत. युझवेंद्र चहलने ८० आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांत ९६ विकेट्स घेतल्या आहेत. त्यापाठोपाठ भूवनेश्वर कुमार असून त्याने ८७ सामन्यात ९० विकेट्स घेतल्या आहेत.
पहिल्या टी२० सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन -भारत - अभिषेक शर्मा, संजू सॅमसन(यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव(कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
इंग्लंड - बेन डकेट, फिल सॉल्ट, जोस बटलर, हॅरी ब्रुक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकॉब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस ऍटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल राशिद, मार्क वूड