संजय गडदे, साम टीव्ही
मुंबईच्या कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 जानेवारी रोजी 41 वर्षीय तरुणाची हत्या झाली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता. हा गुन्हा क्लिष्ट स्वरूपाचा आणि गुंतागुंतीचा असल्याने गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके स्थापन करून तांत्रिक तसेच मानवी कौशल्याचा आणि गोपनिय माहितीच्या आधारे दोन फरार आरोपींना गुन्हे शाखेच्या टीमने अटक केली आहे.
रोहित राजेश चंडालिया, (२९ वर्षे) आणि सागर राजेश पिवाळ, (३० वर्षे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांनी या तरुणाची हत्या का केली, या आरोपींनी अजून दुसरे कोणते गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 19 जानेवारी रोजी एका तरुणाचा मृतदेह मेट्रो कारशेड येथील पाण्याच्या डबक्यात आढळता होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. त्या तरुणाच्या डोक्याच्या डाव्या बाजूस कानाच्या वर मार लागल्याने गंभीर जखम झाल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्या तरुणाला बेशुद्ध अवस्थेत घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यास दाखलपूर्व मृत घोषित केले. मृत तरुणास अज्ञात व्यक्तीने हत्याराने डोक्यात मारुन गंभीर जखमी केल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. यावरून कांजूरमार्ग पोलिसांनी कलम १०३ (१) भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करून आरोपींना शोधण्यास सुरुवात केली.
घडलेला गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने त्याची तात्काळ दखल घेवून गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल करण्याकरता समांतर तपास सुरू केला. हा गुन्हा क्लिष्ट स्वरूपाचा आणि गुंतागुंतीचा असल्याने गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके स्थापन करून तांत्रिक तसेच मानवी कौशल्याचा आणि गोपनीय माहितीच्या आधारे दोन तरुणांना विलेपार्ले परिसरातून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर त्यांनी गुन्हा कबुल केल्याने त्यांना पुढील कार्यवाहीकरिता कांजुरमार्ग पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.