परसदारात घोळ, तेरडा-आघाडा, टाकळा बहरला, की मला ‘आता श्रावण येणार’ हे माहीत असायचं. मनात एक वेगळीच आतूरता असायची. वेगवेगळे सण सुरू होणार म्हणून नाही, तर तिच्या हातचे मस्त, वेगवेगळे पदार्थ खायला मिळणार हा एकमेव विचार असायचा. दीप आमावस्येला ती सकाळीच मला असतील नसतील, तेवढे ढीगभर दिवे काढून द्यायची आणि ते लख्ख साफ करायला लावायची.
मग कणकेचे दिवे करायची माझ्या जोडीला बसून. संध्याकाळ झाली, की एकेका दिव्यात दुपारभर बसून नाकावरचा चष्मा वर सरकवत केलेल्या पातळसर वाती दिव्यात लावायला सांगायची. पावणेसात झाले, की सगळे दिवे तेजोमय व्हायचे. मग त्यातला एक दिवा मला देऊन सांगायची, की ‘जा दत्ताच्या देवळात ठेवून ये.’ (आमच्या वाड्यात आमचं दत्त महाराजांचं देऊळ आहे). माझं औक्षण करायची आणि मला आवडतात म्हणून बत्तासे द्यायची.
बरेचदा श्रावणाचा पहिला दिवस शुक्रवारी यायचा. जिवती पूजेनं श्रावण सुरू व्हायचा. जिवतीची पूजा कशी करायची, का करायची.. हे सगळं एका बाजूला सुरू असायचं. मला त्या वयात ती सजावट, तो सेटअप जास्त छान वाटायचा. मुख्य म्हणजे ‘आजची पूजा लहान मुलांसाठी ना, मग माझ्या आवडीचं काय करशील आज?’ हा मुख्य हेतू असायचा. मग छानसा काहीतरी स्वयंपाक करायची. मी लहानपणी बरेचदा मला भरवल्याशिवाय जेवायचे नाही. मग ‘कार्टी डांबरट आहे’ असं म्हणत ती मला बरेचदा भरवायची.
एकापाठोपाठ एक सण सुरू व्हायचे. नागपंचमीला सकाळीच पाट स्वच्छ धुवून, अष्टगंध भिजवून ठेवायची. मी आले, की मला त्या पाटावर काडेपेटीच्या काडीनं २१ नाग काढायला सांगायची. मला हे सगळं खूपच आर्टिस्टिक वाटायचं. खूप आवडीनं मी सगळं करायचे. कुंकवाचं बोट लावून केलेला कापसाचा हार मग त्या पूजेला वापरायचे. सुग्रास बेत असायचाच त्यानंतर. ते एक ठरलेलं होतं!
माझ्या हातात पिठाचा छोटासा गोळा देऊन मला बोटवं करायला सांगायची. अळूच्या वड्या, फदफदं, वालाचं बिरडं, घोळीची भाजी, टाकळ्याची भाजी, करटुली, शेवळं- चक्क सोडे न घालता शेवळाची भाजी असायची श्रावण स्पेशल. मोदड्यांची वाल घालून भाजी, नारळीभात, वालाचं वरण, ओव्याच्या पानापासून ते जेवढी खाण्यायोग्य पानं असतील त्या सगळ्यांची भजी, शिळा सप्तमीला खास आंबवण म्हणजे शिळी ईडली फ्राय... असे बेत सुरूच असायचे! पिठोरीचं वाण देताना ‘अतीत कोण?’ असं म्हणून मला ‘मीच’ असं म्हणायला लावायची.
पाठोपाठ घारगे तयारच असायचे. माझं औक्षण करताना नेहमी भरपूर कुंकू लावायची. कित्येकदा घारगे खाताना ते नाकावर पडायचं आणि खाल्लंही जायचं. तिला वाकून नमस्कार केल्यावर काही नाणी हळूच हातात सरकवायची. रक्षाबंधनाला स्पेशल मेन्यू, गोपाळकालासाठी वेगळा, देव्हाऱ्याची मस्त सजावट हे सगळं आनंदानं करायची.
तेव्हा तिला तिचं दुखणं, आजार आठवायचा नाही. डायबेटिक असूनही श्रावणातले सगळे गोड पदार्थ ताव मारून खायची. हळूहळू महिना पुढे सरकायचा आणि मग भाद्रपद कधी लागायचा कळायचंही नाही. मैत्रिणींबरोबर विहिरीच्या कठड्यावर बसून भाज्या निवडत गप्पा मारणे हे तिच्या आवडीचं.
मग किचनमध्ये जाऊन मध्येच भाजीला घाटण दे, वरणाला फोडणीच दे असा सगळा कारभार सुरू असायचा. घरकाम करून झाल्यावर आमच्या कविताची आईही समोर तिनं दिलेल्या ताकाचा तांब्या घेऊन गप्पा ऐकायला बसायची. कविताच्या आईला ऐकू येत नसे; पण काकीच्या गप्पा ऐकायला तीही बसायची. आपल्यालाही एक घर आहे हे आठवल्यावर कविताची आई तांब्या घेऊन निघायची.
दुपारतिपार कोणी आलं, तर दार उघडत जाऊ नकोस असं सांगितलेलं असतानाही ती सेल्समेनला खुशाल घरात बोलावून पार त्याचं घर, गाव, पणजोबांपर्यंतची माहिती सहज काढायची. त्याला पाणी दे, चहा दे अशा अनेक गोष्टी करायची. चश्मा असूनही डोळे बारीक करून टीव्हीवर न्यूज चॅनेलला खाली जाणारा इंग्लिशमधला टिकर वाचायची. दुपारी कवळी बाजूला ठेवून झोपायची, टीव्ही आपला सुरूच असायचा, तिला झोप लागायची. कवळी काढून ठेवल्यामुळे तिचा लूज पडलेला गाल हलत राहायचा.
आमचं कुटुंब मोठं. त्यामुळे सणावाराला बच्चेकंपनीला एकत्र मोठ्या थाळ्यातून भरवायची. तिच्या त्या सुरकुतलेल्या मऊ हातात वेगळी ऊब जाणवायची. तिला आजारपण सतत असायचंच अणि तिला आजारपणाची सगळ्यांनी चौकशी केलेली आवडायची. जिद्दीही होती, नाहीतर पायाच्या हाडाचे दोन टुकडे झालेले अस्ताना ऑपरेशन झाल्यावर दोन मजले चढून वर आली नसती गणपतीला. त्या गणपतीनंतर तिला स्ट्रोक आला.. ती कोमात गेली. तोपर्यंत तिची मैत्रीण कर्जत सोडून लांब गेली होती अणि ती तशी एकटी पडली होती.
वाळवणं घालणं तिचा सगळ्यात आवडता प्रकार. ... त्या वर्षी वाळवणं घातली नाही गेली...
ती असताना गच्ची मोकळी होती. आकाश दिसायचं. आता गच्चीवर शेड आहे...
आता ती वाळवणं नाहीत... आणि आजीही नाही...
तिच्या जाण्यानंतर ही अनेक श्रावण येऊन गेले... पण ती असतानाचा श्रावण वेगळा होता...!