Jalgaon Railway Accident: जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर; मुख्यमंत्र्यांची घोषणा
esakal January 23, 2025 07:45 AM

Jalgaon Railway Accident: जळगाव रेल्वे अपघातातील ११ मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई म्हणून ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री सध्या दाओसच्या दौऱ्यावर आहेत, तिथूनच मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओद्वारे ही मदत जाहीर केली आहे. तसंच जखमींवर सरकारकडून उपचार केले जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय सांगितलं?

जळगाव जिल्ह्याच्या पाचोऱ्याजवळ अतिशय भीषण स्वरुपाची ही दुर्घटना घडली आहे. काही लोकांना ट्रेनमधून धूर येतोय किंवा आग लागली आहे, असा त्यांचा समज झाल्यानं त्यांनी ट्रेनमधून उड्या घेतल्या. त्यानंतर समोरुन येणाऱ्या ट्रेननं त्यांना उडवलं, यामध्ये १० ते ११ लोक मृत झाल्याची माहिती मिळते आहे. आमचे मंत्री गिरीश महाजनं घटनास्थळी पोहोचले आहेत.

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर

माझं जिल्हा प्रशासनाशी, पोलीस प्रशासनाशी आणि मंत्री महोदयांशी देखील बोलणं झालेलं आहे. त्यांना मी सूचना केल्या आहेत की, या अपघातातील मृतांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची मदत आम्ही महाराष्ट्र शासनाच्यावतीनं देणार आहोत.

नातेवाईकांना सर्व मदत करणार

तसंच जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण मोफत उपचार ते ज्या हॉस्पिटलमध्ये आहेत तिथे करता येईल. तसंच त्यांचे नातेवाईक ज्या ठिकाणी असतील त्यांना देखील सर्व मदत करण्यात येईल. आमचे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी आहेत ते त्या ठिकाणची सर्व व्यवस्था करत आहेत, असाही मेसेज मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओद्वारे दिला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.