जळगाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दावोसदौऱ्यावर शरद पवार गटाने हल्लाबोल केला. 'दावोसमध्ये होत असलेल्या कंपन्याची नावे पाहता, अधिकतम भारतीय कंपन्या आहेत. मग या कंपन्यासोबत करार करण्यासाठी दावोसला जाण्याची खरंच गरज होती का? असा सवाल शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी विचारला आहे. 'महाराष्ट्रात राज्य सरकार आहे की, नाराज सरकार आहे? असाही सवाल करत कोल्हे यांनी टीका केली.
आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोका कोला कंपनीच्या सीएसआर निधीतून बसविण्यात आलेल्या डिजिटल बोर्डचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी कोल्हे प्रसारमाध्यमांशी बोलले.
अमोल कोल्हे काय म्हणाले?'राज्यात राज्य सरकार आहे की, नाराज सरकार आहे? असा खिल्ली उडवणारा प्रश्न कोल्हे यांनी विचारला आहे. गेली दोन महिने मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रिपदाचे वाटप या नाराजीनाट्यातच सरकार गुरफटलं आहे, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे. असंवैधानिक पदासाठी हे चढाओढ का करत आहेत? केवळ जिल्ह्यातील निधी वाटपाचे हक्क मिळावे, यासाठी हे सगळं चाललं की विकासासाठी चाललंय? असे अनेक प्रश्न यांनी उपस्थित केले आहेत.
'हातातोंडाशी आलेला पुणे-नाशिक रेल्वेला घास हरवायचा आहे? की तीस देशांच्या संशोधनासाठी जुन्नरमध्ये होणाऱ्या जीएमआरटी प्रकल्पाचं ओझं वाहायचं आहे? असा प्रश्न कोल्हे यांनी उपस्थित केलाय. जीएमआरटी हवं असेल तर पुणे-नाशिक रेल्वे रद्द होणार नाही, असा तोडगा सरकारने काढावा, अशी मागणी कोल्हे यांनी केली.