Pushpak Express Accident: जळगाव रेल्वे अपघाताला आगीची अफवा नाही तर 'ही' घटना ठरली कारणीभूत, जाणून घ्या नेमकं कारण!
esakal January 23, 2025 04:45 AM

महाराष्ट्रातील जळगाव येथील पारधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या अफवेमुळे अनेक प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. कर्नाटक एक्स्प्रेस पलीकडून जात होती, या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. एका अफवेमुळे ११ लोकांचा जीव घेतला आहे. मात्र फक्त अफवाच या अपघाताला कारणीभूत ठरली नाही तर अजून घटना याला कारणाभूत ठरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पारधाडे स्थानकाजवळ पुष्पक एक्स्प्रेस जात होती. यावेळी रेल्वेतील एका प्रवाशाने चेन खेचली. मग मोटरमनने ब्रेक लावला. त्यानंतर चाकांमधून ठिणग्या निघू लागल्या. त्यामुळे ट्रेनला आग लागल्याची अफवा पसरली. काही वेळातच गोंधळ उडाला आणि प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली. त्यानंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे.

चाकांखाली ठिगण्या पाहायला मिळाल्या. त्यानंतर अफवा उठली. मात्र या अपघाताचे मुख्य कारण प्रवाशांने खेचलेली चेन आहे. या प्रवाशाने चेन का खेचली. त्यामागचा उद्देश काय होता. हे अद्याप कळू शकले नाही. मात्र चेन खेचल्यानंतर ही घटना घडली आहे. यामुळे आता शोक व्यक्त केला जात आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, हा अपघात दुपारी 3.30 ते 4 च्या दरम्यान झाला होता. यानंतर काही लोकांनी ट्रेनमधून उड्या मारल्या.समोरून कर्नाटक एक्स्प्रेस येत होती, त्यात अनेकांना चिरडले. समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसनेही हॉर्न वाजवला नाही, असा दावाही काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. हॉर्न दिला असता तर प्रवाशांना सावध केले असते.

नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी एएनआयला सांगितले की, पुष्पक एक्स्प्रेसचे प्रवासी रुळावर होते. तेवढ्यात कर्नाटक एक्स्प्रेस लगतच्या ट्रॅकवरून जात असताना अनेक प्रवाशांना त्याचा फटका बसला. आम्ही घटनास्थळी आहोत. अतिरिक्त एसपी, एसपी, जिल्हाधिकारी आदी अधिकारीही पोहोचत आहेत. आम्ही डीआरएम आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधत आहोत. 8 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अतिरिक्त रेल्वे रेस्क्यू व्हॅन आणि रेल्वे रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात येत आहेत. प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.