Jalgaon Train Accident : जळगावात रेल्वे ट्रॅकवर मृत्यूचं तांडव; पुष्पक एक्स्प्रेसच्या अपघातात ११ जणांचा मृत्यू, सरकारकडून घटनेची चौकशी होणार
Saam TV January 23, 2025 04:45 AM

jalgaon railway accident : जळगावाच्या परधाडे रेल्वे स्टेशनजवळ भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेमुळे प्रवासी ट्रॅकवर उतरले. त्यानंतर दुसऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने प्रवाशांना चिरडले. त्यानंतर रेल्वे ट्रॅकवर मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं. या भीषण अपघातानंतर रेल्वे मंत्रालयाकडून उच्चस्थरीय चौकशी केली जाणार आहे.

नेमकं काय घडलं?

रेल्वेचे अधिकारी दिलीप कुमार यांनी सांगितलं की, 'पुष्पक एक्स्प्रेसमधील काही प्रवाशांनी अलार्म चेन खेचली. त्यानंतर लोक ट्रेनमधून उतरले. दुसरीकडे बेंगळुरू-नवी दिल्ली-कर्नाटक एक्स्प्रेस येत होती. या ट्रेनखाली चिरडल्याने काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. भुसावळचे अनेक लोक ट्रेनमध्ये शिरले होते. त्यांनी अलार्म चैन खेचली. त्यानंतर लोक चुकीच्या ट्रॅकवर उतरले. त्यानंतर सर्व प्रवासी ट्रॅकवर उभे होते. त्याचदरम्यान भरधाव ट्रेनने प्रवाशांना चिरडले. या अपघाताच्या घटनेनंतर वैद्यकीय टीम देखील घटनास्थळी पोहोचली आहे. तसेच अपघातातील जखमींवर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत.

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 'जळगावातील पुष्पक एक्स्प्रेसची दुर्घटना मनाला हेलावून टाकणारी आहे. या दुर्घटनेत कुणी अफवा पसरवली असेल, त्याची रेल्वे मंत्रालयाकडून निश्चित उच्चस्तरीय चौकशी होईलच. पण सध्या राज्य सरकार यासंदर्भात तातडीने युद्धपातळीवर बचावकार्य करतंय. जखमींना तात्काळ उपचार देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असले, तरी या दुर्घटनेबाबत लक्ष ठेवून आहेत. या दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांवर ओढवलेल्या या दुःखात महायुती सरकार त्यांच्यासोबत आहे'.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.