Thane: कोपरीत चिकन-मटण विक्री ५ फेब्रुवारीपर्यंत बंदी; बर्ड फ्लू रोखण्यासाठी उपाययोजना
esakal January 23, 2025 02:45 PM

Thane: पोलिस आयुक्त यांच्या बारा बंगला येथील शासकीय निवासस्थानी पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची बाब समोर आल्यानंतर आता पालिका प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून कोपरी परिसरातील चिकन-मटण विक्री दुकाने ५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तशा नोटिसादेखील बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे पूर्व बारा बंगला परिसरातील ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे मागील आठवड्यात समोर आले. यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने बंगल्याच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या.

तसेच परिसरात बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखड्यानुसार उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती. यानुसार पशुसंवर्धन विभागाच्या उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक तयार करण्यात आले.

या पथकांमध्ये राज्याचा पशुसंवर्धन विभाग, ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या भागातील कोंबड्या आणि इतर पाळीव पक्ष्यांचे नुमनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात काहीच आढळून आले नाही. तसेच या पथकाने १२७ नागरिकांची आरोग्य तपासणी करून ७५ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात काही आढळून आलेले नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.