Latest Pune News: बी. टी. कवडे रस्ता परिसरात टोळक्याने दहशत पसरवत कोयत्याने १५ ते २० वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी (ता. २२) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये चारचाकी वाहने, बस, टेम्पो, रिक्षा आणि तीन ते चार दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
प्राप्त माहितीनुसार, रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गजबलेल्या बी.टी. कवडे रस्त्यावर दोघेजण हातात कोयता घेऊन फिरत होते. दिसेल त्या वाहनांवर हत्यारांनी वार करत होते. ससाणे उद्यान ते बी.टी. कवडे रस्ता परिसरात ही तोडफोड केली. एका चायनीज खाद्य पदार्थाच्या गाडीवर कोयत्याने वार करून हॉटेलमध्ये गेले.
त्याठिकाणी तोडफोड केल्यानंतर बसेरा कॉलनीत रस्त्याच्या कडेला लावलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या. वाहने फोडताना अडविणाऱ्या नागरिकांनी कोयता दाखवून धमकी दिली. त्यावेळी काही दुकानदार पकडण्यासाठी मागे धावले. त्यावेळी ते निगडे नगर येथील रिक्षात लपून बसले.
याबाबत माहिती मिळताच नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पोलिसांनी कौशल लांडगे (वय २०, रा. भीमनगर) याच्यासह एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलकंठ जगताप यांनी दिली.