Uddhav Thackeray: ''एकटं लढण्याचा आग्रह.. कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार'' उद्धव ठाकरेंकडून स्वबळाची घोषणा?
esakal January 24, 2025 05:45 AM

Shivsena UBT: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या निश्चय झाल्याचं आता जवळपास स्पष्ट दिसतंय. गुरुवारी बीकेसीमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपपणे स्वबळाचे संकेत दिले आहेत. यावेळी त्यांनी हिंदुत्वावरुन अमित शाहांवर जोरदार हल्ला चढवला. हा केवळ ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे, असंही ठाकरे म्हणाले.

बीकेसीमध्ये आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सगळ्यांचं मत आहे की एकटं लढा.. ताकद आहे? अमित शाहांना जागा दाखवणार आहात? ठीक आहे, पण अजून निवडणूक जाहीर झालेली नाही. मला तुमची जिद्द बघू द्या, तयारी बघू द्या.. ज्या भ्रमात आपण राहिलो त्या भ्रमातून बाहेर या. ज्या क्षणी आपली खात्री पटेल, आपली तयारी होईल, तेव्हा मी कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही.

मला सूड उगवायचाय- ठाकरे

ठाकरे पुढे म्हणाले की, पण यावेळेला मला सूड उगवून पाहिजे. सूड..सूड आणि सूड. होय सूड! जो महाराष्ट्राच्या पाठीत वार करतो, जो मराठी आईच्या कुशीवर वार करतो, तो गद्दार आणि त्या गद्दाराचा वरदहस्त मला महाराष्ट्रात दिसता कामा नये.

''जर तुम्ही सगळे शपथ घेऊन सांगत असाल तर जेव्हा वेळ येईल तेव्हा मी एकटं लढण्याचा निर्णय नक्की घेतल्याशिवाय राहणरा नाही. आज परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि अमित शाहांना सांगतो, जास्त आमच्या नादी लागू नका. आज थोडाचा ट्रेलर दाखवला आहे. जेवढे अंगावर याल, तेवढे वळ घेऊन दिल्लीला परत जाल.'' असं म्हणत ठाकरेंनी भाजपवर सणसणीत हल्ला केला.

उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. विशेषतः ठाकरेंचं मुंबईवर लक्ष्य आहे. मुंबई महानगर पालिका ही सातत्याने ठाकरेंच्या ताब्यात राहिलेली आहे. ही महानगर पालिका महायुतीकडे गेली तर त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं.

उद्धव ठाकरे यांनी अद्याप स्वबळाची घोषणा केलेली नसली तरी त्यांच्या बोलण्यातून एकटं लढण्याबाबत निश्चय झाल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडी येत्या काळात फुटू शकते, असं दिसतंय. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित राहतात की काही नवीन समीकरण बघायलं मिळतं, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.