कोलकात्यात भारताने इंग्लंडचा 7 गडी राखून धुव्वा उडवला. खरं तर या सामन्यात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली. अभिषेक शर्माने इंग्लंडच्या गोलंदाजांना धू धू धुतला. मात्र दारूण पराभव झाल्यानंतरही इंग्लंडच्या गोलंदाजाच्या डोक्यात भलतंच सुरु आहे. हा विजय भारताला नशिबाने मिळाला असं बेताल वक्तव्य इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याने केलं आहे. इतकंच काय तर पुढच्या सामन्यात टीम इंडियाला जागा दाखवू असं आव्हानही दिलं आहे. जोफ्रा आर्चर म्हणाला की, ‘कोलकात्याची स्थिती गोलंदाज म्हणून माझ्यासाठी अनुकूल होती. आमच्या दुसऱ्या गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी केली. पण भारताचे फलंदाज नशिबवान होते. त्यांनी जे काही उत्तुंग फटके मारले ते अशा जागी पडले तिथे खेळाडू नव्हते. पुढच्या सामन्यात आम्ही झेल पकडू आणि भारताची 40 धावांवर 6 विकेट अशी स्थिती करू.’ या सामन्यात अभिषेक शर्माचा झेल सुटला आणि तिलक वर्माविरुद्ध काही संधी निर्माण झाल्या होत्या. इंग्लंडकडून आर्चरने 4 षटकात 21 धावा देत 2 बळी घेतले.
पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 132 धावांवर गारद झाला होता. कर्णधार जोस बटलरने सर्वाधिक 68 धावा केल्या होत्या. भारताकडून वरुण चक्रवर्तीने सर्वाधिक 3 बळी घेतले.प्रत्युत्तरात अभिषेकच्या (79) खेळीमुळे भारताने 12.5 षटकांत 3 गडी गमावून लक्ष्य गाठले.या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ‘भारतात फलंदाज गोलंदाजांवर वरचढ होतात. असं अनेकदा आयपीएलमध्ये पाहिलं गेलं आहे. त्यामुळे गोलंदाजांना मेहनत करावी लागते.’ असं जोफ्रा आर्चर म्हणाला. जर कोलकात्यात काही विकेट झटपट बाद करण्यात यश मिळालं असतं नक्कीच विजय मिळवू शकलो असतो, असं सांगण्यासही तो विसरला नाही.
दुसरा टी20 सामना 25 जानेवारी रोजी चेन्नईत खेळवला जाणार आहे. आता मालिकेतील दुसरा टी20 सामना 25 जानेवारी रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल. इंग्लंडला टी20 मालिकेत कमबॅक करण्यासाठी हा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. अन्यथा मालिकेत कमबॅक करणं खूपच कठीण होईल. 2012 पासून भारतीय टी20 मालिकेत इंग्लंडवर भारी पडला आहे.