मुंबईचा ऑलराउंडर शार्दूल ठाकुर याने रणजी ट्रॉफी स्पर्धेत जम्मू काश्मीरविरुद्धच्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात तडाखेदार शतक ठोकलंय. शार्दूलने मुंबई अडचणीत असताना ही शतकी खेळी केली आणि टीमला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. शार्दूलने या खेळीसह टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिलंय.तसेच टीम इंडियात कमबॅकचा दावा ठोकला आणि आयपीएल फ्रँचायजीला विचार करण्यास भाग पाडलं आहे. शार्दूल गेल्या अनेक महिन्यांपासून टीम इंडियातून बाहेर आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी झालेल्या आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये शार्दुल अनसोल्ड राहिला होता.
शार्दुलने 24 जानेवारीला मुंबईतील बीकेसी ग्राउंडमध्ये हे शतक केलं. शार्दुलने 60 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर खणखणीत चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. शार्दुलने या चौकारानंतर ड्रेसिंग रुमच्या दिशेने जोरात धाव घेतली आणि शतकी जल्लोष केला. शार्दुलने 105 चेंडूत ही शतकी खेळी केली. शार्दूलचं हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दुसरं शतक ठरलं.
मुंबईचे फलंदाज दुसऱ्या डावात सपशेल अपयशी ठरले. कॅप्टन अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर यासारखे फलंदाज ढेर झाले. त्यामुळे मुंबईची स्थिती 6 बाद 91 अशी झाली. मात्र शार्दुलने तनुष कोटीयन याच्यासह मुंबईचा डाव सावरला. दोघांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली आणि जेकेची आघाडी मोडीत काढली. शार्दुलने 15 चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केलं. शार्दुलच्या शतकानंतर मुंबईची धावसंख्या 7 बाद 250 अशी होती. मुंबईने तोवर 164 धावांची आघाडी घेतली. त्यामुळे मुंबईने ही आघाडी दुप्पट करुन जेकेला विजयासाठी डोंगराएवढं आव्हान द्यावं, अशी अपेक्षा क्रिकेट चाहत्यांची आहे.
शार्दुलचं ‘फर्स्ट क्लास’ शतक
मुंबई प्लेइंग ईलेव्हन : अजिंक्य रहाणे (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शिवम दुबे, शार्दुल ठाकुर, शम्स मुलानी, तनुष कोटीयन, मोहित अवस्थी आणि कर्ष कोठारी.
जम्मू-काश्मीर प्लेइंग ईलेव्हन : पारस डोगरा (कॅप्टन), शुभम खजूरिया, विवरांत शर्मा, अब्दुल समद, कन्हय्या वधावन (विकेटकीपर), औकिब नबी डार, यावर हसन, युद्धवीर सिंह चरक, आबिद मुश्ताक, उमर नझीर मीर आणि वंशज शर्मा.