सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने बुधवारी 22 जानेवारीला इंग्लंडवर 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने यासह नववर्षाची सुरुवात विजयाने केली. टीम इंडियाने विजयासाठी मिळालेलं आव्हान हे 3 विकेट्स गमावून 12.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्थी हे दोघे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले. अभिषेकने 79 धावांची स्फोटक खेळी केली. तर त्याआधी वरुणने 3 विकेट्स घेतल्या. वरुणला या कामगिरीसाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. तसेच अर्शदीप सिंह यानेही 2 विकेट्स मिळवल्या. मात्र अर्शदीपने या विजयानंतर युझवेंद्र चहलची ऑन कॅमेरा माफी मागितली. अर्शदीपने चहलची माफी का मागितली? जाणून घेऊयात.
अर्शदीपने या सामन्यात 4 ओव्हरमध्ये 17 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. अर्शदीप यासह टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. अर्शदीपने यासह युझवेंद्र चहलचा महारेकॉर्ड ब्रेक केला. सामन्यानंतर अर्शदीपने यासाठी माफी मागितली.
बीसीसीआयने सोशल मीडियावर एक व्हीडिओ पोस्ट केलाय.या व्हीडिओत अर्शदीप सिंह याने किती विकेट्स घेतल्या आणि कुणाला आऊट केलं? याबाबत वरुण चक्रवर्थी सांगत आहे. तर अर्शदीप वरुणने घेतलेल्या विकेट्सबद्दल सांगतोय. या व्हीडिओत दोघेही सामन्याबाबत आणि एकमेकांबाबत बोलत आहे. व्हीडिओच्या शेवटी अर्शदीप चहलचा रेकॉर्ड ब्रेक मोडल्याने त्याची कान धरुन माफी मागताना दिसतोय. अर्शदीपच्या या कृतीचं कौतुक केलं जात आहे. तसेच अर्शदीप किती नम्र आहे, असंही म्हटलं जात आहे.
दरम्यान अर्शदीप सिंह याने आतापर्यंत 61 टी 20i सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. अर्शदीपने 61 सामन्यांमध्ये 17.90 च्या सरासरी आणि 8.24 च्या इकॉनमीने 97 विकेट्स घेतल्या आहेत. तर चहलच्या नावावर 96 विकेट्सची नोंद आहे.
दुसऱ्या टी 20i सामन्यासाठी इंग्लंडचा 12 सदस्यीय संघ : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप साल्ट (विकेटकीपर), जेमी स्मिथ (विकेटकीपर), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.