कोलकात्यात इंग्लंडचा धुव्वा उडवल्यानंतर आता हिंदुस्थानी संघ चेन्नईतही विजयी सातत्य राखत पाच टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेण्याच्या इराद्यानेच उतरणार आहे. विजयी सलामीमुळे जोशात असलेला हिंदुस्थानी संघ उद्या तरी मोहम्मद शमीला पुनरागमनाची संधी देतो की नाही याबाबत अद्याप साशंकताच आहे.
ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने पाहुण्या इंग्लंडचा 43 चेंडू आणि 7 विकेटनी सहज पराभव केला होता. या सामन्यात हिंदुस्थानी फिरकी माऱयापुढे इंग्लंडचा डाव 132 धावांत ढेपाळला होता. अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्थीने 45 धावांत इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत धाडला होता. या सामन्यात हार्दिक पंडय़ा हिंदुस्थानचा दुसरा वेगवान गोलंदाज होता आणि त्याला जोस बटलरने चांगलेच फटकावले होते. चेन्नईच्या खेळपट्टीवरही हिंदुस्थानी संघ आपला फिरकी ताफाच मैदानात उतरवण्याची शक्यता अधिक आहे. तीन फिरकीवीरांपैकी एकाला विश्रांती देत शमीला पुनरागमन करता येऊ शकते. पण संघव्यवस्थानाच्या या निर्णयाबाबत कसलेच संकेत न मिळाल्यामुळे पुन्हा एकदा तीन फिरकीवीर मैदानात उतरले तरी कुणाला आश्चर्य वाटणार नाही.
पहिल्या सामन्यात अभिषेक शर्माच्या 34 चेंडूंतील 79 धावांच्या फटकेबाजीने अवघा सामना एकतर्फी केला होता. इंग्लंडला फार मोठे लक्ष्य गाठता न आल्यामुळे एकटा अभिषेकच विजयासाठी पुरेसा ठरला होता, मात्र या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवला आपल्या धावांचे खातेच उघडता आले नव्हते. चेन्नईतही नाणेफेक जिंकल्यावर प्रथम क्षेत्ररक्षण निश्चित असल्यामुळे प्रथम फलंदाजीला कोण येतोय, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
हिंदुस्थानच्या तुलनेत इंग्लंडची फलंदाजी अधिक घातक वाटतेय. मात्र ईडन गार्डन्सवर एकटा जोस बटलर सोडला तर कुणालाही सूर गवसला नव्हता. उद्या पुन्हा एकदा इंग्लंड त्याच आघाडीवीरांसह हिंदुस्थानच्या फिरकीला फोडून काढण्यासाठी मैदानात उतरेल. फिल सॉल्ट, बेन डकेट, हॅरी ब्रुक आणि लियाम लिव्हिंगस्टोन हे झंझावाती फलंदाज इंग्लंडची खरी ताकद आहे. या चौघांपैकी एकाचीही बॅट तळपली तर इंग्लंडला मोठी धावसंख्या करण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. चेन्नई जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचे इंग्लंडचे एकमेव ध्येय आहे.
थेट प्रक्षेपण सायं. 7 पासून स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार