महाकुंभ मेळ्याला गेलेल्या कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये लष्करी अधिकाऱ्यासह मुलगी आणि सोबतच्या एका व्यक्तीचा समावेश आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज-वाराणसी महामार्गावर मिर्जामुराद इथं हा अपघात झाला. अपघातात शिवजी सिंह यांची पत्नी नीरा देवी आणि राजीव सिंह यांची पत्नी अलका सिंह गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर बनारसच्या बीएचयूमध्ये उपचार सुरू आहेत.
राजीव सिंह यांचे वडील शिवदयाल सिंह यांनी सांगितलं की, मुलगा राजीव आणि सून नीरा हे कुंभस्नानासाठी सुक्रवारी शिवजी सिंह यांच्यासोबत गेले होते. स्नान करून परतत असताना अपघातात राजीव सिंह, शिवजी सिंह आणि त्यांची मुलगी सोनम कुमारी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राजीवचा व्यवसाय होता. त्याचा एक मुलगा असून तो एमबीएचं शिक्षण घेत आहे.
लष्करी अधिकारी शिवजी सिंह यांचे शेजारी असलेल्या राजीव यांच्या वडिलांनी सांगितलं की, शिवजी सिंह, त्यांची पत्नी नीरा देवी, मुलगी सोनम कुमारी, शेजारी राजीव कुमार आणि त्यांची पत्नी अलका सिंह कारने कुंभ स्नानासाठी गेले होते. स्नान आटोपून सगळे घऱी परतत होते. त्यावेळी मिर्जामुरादजवळ कारचा अपघात झाला. कार डंपरला धडकून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले.
शिवजी सिंह हे मुळचे बिहारचे आहेत. सहा महिन्यांपूर्वीच ते खरनागढा इथं शिफ्ट झाले होते. लष्करात अधिकारी असलेले शिवजी सिंह लेहमध्ये ड्युटीवर होते. सुट्टीत ते धनबाद इथल्या घरी आले होते. दिल्लीहून विमानाने त्यांना ड्युटीवर जायचं होतं. पण खराब वातावरणामुळे विमान रद्द करण्यात आलं आणि ते जायचे थांबले. त्यामुळे त्यांनी महाकुंभला जाण्याचा प्लॅन केला होता असं राजीव सिंह यांच्या वडिलांनी सांगितलं.