मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहे. मात्र, अलीकडच्या काळात सार्वजनिक व्यासपीठांवर शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी एकत्र बसणे किंवा बोलणे कटाक्षाने टाळले होते. नुकत्याच इंदापुरात झालेल्या कार्यक्रमातही अजित पवार हे स्टेजवर बसले होते. तर त्यांच्या भगिनी सुप्रिया सुळे (सुप्रिया सुळे) यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत प्रेक्षकांमध्ये बसणे पसंत केले होते. त्यामुळे पवार कुटुंबीयांमधील दुरावा संपला नसल्याचे बोलले जात होते. मात्र, अशातच आता अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. दैनिक ‘महाराष्ट्र टाईम्स’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार अजितदादांनी शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केल्याचे सांगितले जाते.
काही दिवसांपूर्वी शरद पवार हे सांगली आणि कोल्हापूर दौऱ्यावर होते. कोल्हापुरातील कार्यक्रमादरम्यान भाषण करतानाच शरद पवारांना त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांचे नियोजित दौरे रद्द करण्यात आले होते. शरद पवार यांच्या कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. शरद पवार यांना खोकला आणि कफचा त्रास होत आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्यामुळे ते मोदी बागेतील त्यांच्या निवासस्थानी विश्रांती घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी शरद पवारांना फोन करुन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये एक कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर शरद पवार आणि अजित पवार यांनी एकमेकांच्या शेजारी बसणे टाळले होते. त्यासाठी ऐनवेळी व्यासपीठावरील आसनव्यवस्था बदण्यात आली होती. या गोष्टीचा राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, या जाहीर कार्यक्रमापूर्वी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बंद खोलीत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठकीसाठी पोहोचल्यानंतर अजित पवार यांनी ‘साहेब (शरद पवार) कुठे बसले आहेत,’ अशी विचारणा केली आणि थेट ‘साहेब’ बसलेल्या कार्यालयात दाखल झाले. यावेळी कार्यालयात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांसोबत बोलत होते. शरद पवार यांच्यासमवेत अजित पवार आणि वळसे पाटील हे 15 ते 20मिनिटे बंद खोलीत होते. त्या ठिकाणी माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील दाखल झाल्यानंतर सर्व जण बैठकीसाठी गेले. ही बैठक सुरू होण्यापूर्वी काका-पुतणे यांच्यासह वळसे पाटील यांच्यात 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे पडद्यामागे काका आणि पुतण्यात चर्चा सुरु असल्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सक्रिय झाला आहे. सोमवारी सकाळी 11 वाजता मुंबई विभागाची बैठक पक्षाच्या प्रदेश कार्यालयात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित होणार. सलग दोन दिवस या बैठकांचं सत्र हे पक्षाच्या कार्यालयात सुरू असेल. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या मवीआ मधे प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढवण्यास तयार आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही ठाकरेंच्या शिवसेने सोबत लढण्यास उत्सुक आहे आणि पक्षातील कार्यकर्त्यांची भावना आहे. या दोन दिवसीय बैठकीमध्ये मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
शरद पवार-अजितदादा पुन्हा एकत्र येणार? रोहित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यानं भुवया उंचावल्या!
अधिक पाहा..