चाकोरीबाहेरच्या अर्थपूर्ण शिक्षणाचा रसाळ वेध
esakal January 26, 2025 08:45 AM

- संतोष कुलकर्णी, editor@esakal.com

शिक्षक ते महाराष्ट्रातील विविध शासकीय शैक्षणिक संस्थांवर मानाची पदं भूषवणारे अधिकारी डॉ. अनिल कुलकर्णी यांचा व्यावसायिक प्रवास हा थक्क करणारा आहे. त्यांचे ''पुस्तकांच्या पलीकडे'' हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक वेगळेच आहे.

डॉ. कुलकर्णी यांच्या या पुस्तकामध्ये मानवी जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनौपचारिक शिक्षणाशी संबंधित गोष्टींचा ऊहापोह केलेला आहे. शिक्षणतज्ज्ञ प्रा. रमेश पानसे यांची प्रस्तावना आहे. सुटसुटीत आणि काळजाला भिडणारी वाक्यरचना हे कुलकर्णी यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे. आपली भूमिका केवळ संदेशवाहकाची आहे हे तत्त्व त्यांनी या पुस्तकात कसोशीने पाळलेलं दिसतंय.

आशय सोपा, सरळ आणि सुटसुटीत असला पाहिजे ही त्यांची भावना लक्षात येते. अनौपचारिक शिक्षणाशी संबंधित ५४ लेखांचा समावेश या पुस्तकामध्ये आहे. महाराष्ट्रात गाव पातळीवर काम करणाऱ्या शिक्षक व विविध शाळांच्या यशोगाथा ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत शिक्षणाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न त्यांनी यातून केलेला आहे. शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या ग्रासरूटर ते पॅराशूटर व्यक्तिमत्त्वांची मालिकाच त्यामुळे आपल्या लक्षात येते.

विषम परिस्थितीमध्येही अत्यंत तावून-सुलाखून निघालेल्या अनेक व्यक्तिमत्त्वांची ओळख त्यांनी या पुस्तकातून करून दिलेली आहे. त्यामध्ये मोक्षा रॉय, ॲसिड हल्ल्यातून बचावलेली आणि दहावीच्या परीक्षेत अव्वल आलेली अंध कफी अशा प्रसिद्धीपासून दूर असलेल्या व्यक्तींनाही त्यांनी आपल्या पुस्तकाचं नायकत्व बहाल केलेलं आहे. त्यांच्या यशोगाथा या केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी आदर्शवत आहेत.

व्यक्ती केवळ शाळा नामक इमारतीच्या चार भिंतींच्या आत घडतो असं नाही. तर, अनेक अदृश्य बिंदू त्याच्या उत्थानासाठी कारणीभूत असतात. त्यामध्ये पत्राची महत्ता ‘जीएंची पत्रवेळा'' या लेखातून एकेकाळी पत्रांचं मानवी भावविश्वात किती मोठं स्थान होतं...! हे लक्षात येतं. नव्या पिढीला जीए अर्थात मराठी साहित्यिक जी.ए. कुलकर्णी कळले पाहिजेत हे सांगताना, दुर्बोधतेतही जसा ग्रेस असतो तसा अस्वस्थतेत जीए असतात हे वाक्य मला खूप आवडलं. शरीराने व्यक्त होणं यांत्रिक असतं. तर मनाने व्यक्त होणे हे सांस्कृतिक...! हे देखील त्याच लेखातील एक दर्जेदार वाक्य..!

तरुणपण कशासाठी? आंतरजालाचे मायाजाल, कशी होऊ उतराई ? हे लेखही असेच जमलेले आहेत. भारतीय संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान या दोन बिंदूंना जोडणारा एक अदृश्य धागा या पुस्तकाच्या वाचनातून जाणवतो. पुस्तक वाचत असताना मला, निरीक्षण हा शिक्षणाचा पाया आहे या तत्त्वाची पुन्हा एकदा उजळणी झाली याचा विशेष आनंद वाटतो. माणूस शिक्षणातल्या शहाणपणाची एक पायरी वर चढतो तो केवळ आणि केवळ निरीक्षण या तत्त्वामुळे हे आपण कधीही विसरता कामा नये. कुलकर्णी सरांनी आपल्या या पुस्तकातून सातत्याने निरीक्षण या तत्त्वावर जोर दिलेला आहे असे मला जाणवले..

हल्ली, केवळ बौद्धिक प्रगती म्हणजेच शिक्षण ही एक भारतीय शिक्षण क्षेत्रात विकृती वाढीस लागली आहे. शारीरिक आणि भावनिक विकास याला भारतीय शिक्षण व्यवस्थेत कुठेही स्थान नाही की काय! अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि समाजही त्याच पद्धतीचा आकाराला येत आहे. मार्क (परीक्षेतील) आणि गुण (व्यक्तित्वातील) या दोन शब्दांमधला फरक नाहीसा होत चालला आहे. त्यामुळेच हल्ली समाजात शारीरिक आणि मानसिक दुर्बलता वाढीस लागली आहे.

विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि भावनिक क्षमता उंचावल्याखेरीज ती सुदृढ आणि संवेदनशील मनुष्य म्हणून आपलं आयुष्य जगू शकणार नाहीत. हल्ली शुष्क होत चाललेला भावनिक ओलावा हा माणसाला त्याच्या मूळ होमोसेपियन या जीवशास्त्रीय नावाकडे अधिक वेगाने घेऊन चालला आहे, असे मला एक शिक्षक म्हणून प्रकर्षाने जाणवते. अशा परिस्थितीत ''पुस्तकांच्या पलीकडे'' यांसारखी पुस्तके दीपस्तंभाचे काम करतात म्हणूनच त्यांचे महत्त्व अधिक !

पुस्तकाचे नाव : पुस्तकांच्या पलीकडे

लेखक : डॉ. अनिल कुलकर्णी

प्रकाशक : शब्दान्वय प्रकाशन, मुंबई (९३२१७७३१६३, ९२२६१३०७१०)

पृष्ठं : १७६

मूल्य : ३५० रुपये

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.