नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल राजकारणात आले तेव्हा ते छोट्या मोटारीत फिरायचे, स्वच्छ राजकारणाचा दावा करायचे. पण सर्वात मोठा मद्य गैरव्यवहार दिल्लीतच झाला, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीच्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान एका सभेला संबोधित करताना केली.
केजरीवाल राजकारणात आले तेव्हा त्यांच्यापाशी छोटी मोटार होती. आता ते शीशमहलमध्ये राहतात. हे वास्तव आहे. केजरीवाल नव्या पद्धतीने राजकारण करण्याच्या आणि दिल्लीला बदलण्याच्या गोष्टी करायचे. पण जेव्हा गरिबांना त्यांची गरज होती तेव्हा ते दिसले नाही. दिल्लीत हिंसाचार झाला तेव्हा ते कुठेच दिसले नाहीत.
केजरीवाल मनास येईल ते बोलतात, असे पटपडगंज येथे एका प्रचारसभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. त्यांनी राज्यघटना आणि डॉ. आंबेडकर यांचा अपमान केला आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
संविधानाने सर्वांना समान अधिकार दिले असले तरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नव्या संसद भवनाचे आणि राम मंदिराचे उद्घाटन होत असताना त्यांना निमंत्रण दिले नाही. त्या तिथे जाणार नाहीत, असे मोदींनी म्हटल्याचा दावा राहुल गांधींनी केला.