नवी दिल्ली : ‘आप’ नेते अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांना आधारकार्ड बनवण्याचे मशिन बनविले असल्याचा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी मंगोलपुरी येथे भाजपचे उमेदवार राजकुमार चौहान यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलताना केला. मतांसाठी रोहिंग्या, बांगलादेशी नागरिकांना दिल्लीत वसवण्याचे ‘आप’ चे कारस्थान असल्याचे योगी आदित्यनाथ यांनी यावेळी सांगितले.
स्वतंत्र भारतात नेत्यांवर अनेक गुन्हे दाखल झाले. पण आम आदमी पक्ष वगळता इतर कोणत्या पक्षावर गुन्हा दाखल झालेला नाही. श्रमिक कल्याण मंडळाचे पैसे या लोकांनी हडप केले. या पैशाचा सदुपयोग झाला असता तर श्रमिक कामगारांची स्थिती दयनीय झाली नसती. देशाच्या सुरक्षेला खिंडार पाडण्याचे काम करणाऱ्या या पक्षाने प्रत्येक निवडणूक ही कोणते ना कोणते षडयंत्र रचण्यासाठी लढली आहे.
केजरीवाल यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आधारकार्ड बनवणारे मशीन बनवले आहे. या मशिनच्या माध्यमातून रोहिंग्या आणि बांगलादेशीयांना वसवले जात आहे. ओखला येथे उद्योगधंदे सुरु करण्याऐवजी घुसखोरांचे अड्डे बनवले जात आहेत, असे योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
आम आदमी पक्ष हा भ्रष्टाचार आणि अनागोंदीचा पर्याय बनला असल्याचे सांगत योगी आदित्यनाथ म्हणाले की, केजरीवाल यांनी त्यांचे गुरू अण्णा हजारे यांना धोका दिला. अशा व्यक्तीच्या पक्षाला दिल्लीकरांनी मत देऊ नये. दिल्ली मेट्रो आणि रॅपिड रेल्वेसाठी यांच्या सरकारने पैसा दिला नाही.
हा पक्ष विकास आणि दलितांच्या विरोधात आहे. ''आप'' च्या पापामुळे यमुना नदीचे नाल्यात रूपांतर झाले आहे. या लोकांच्या पापाचे परिणाम मथुरा, आग्रा आणि वृंदावन येथील लोक आणि भक्तांना भोगावे लागत आहेत. दिल्लीतून ''आप'' ला हद्दपार झाली तरच या नरकातून बाहेर पडता येणे शक्य होणार आहे.