ताहिर हुसैन लढवतोय दिल्लीत निवडणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2020 मधील दिल्ली दंगलीप्रकरणी आरोपी अन् मुस्तफाबाद मतदारसंघातील एआयएमआयएमचा उमेदवार ताहिर हुसैनने सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अन् अटींनुसार प्रचारमोहीम सुरू केली आहे. कस्टडी पॅरोलवर 5 वर्षांनी तुरुंगातून बाहेर पडलेल्या ताहिरने मुस्तफाबाद मतदारसंघात बुधवारी प्रचार केला. यावेळी त्याने माझ्या अश्रूंची लाज राखा असे भावुक आवाहन लोकांना केले आहे.
दिल्ली दंगलीदरम्यान आम आदमी पक्षाचा नगरसेवक राहिलेला ताहिर आता एआयएमआयएममध्ये दाखल झाला आहे. असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने ताहिरला मुस्तफाबाद मतदारसंघाची उमेदवारी दिली आहे. ओवैसी यांनी त्याच्या समर्थनार्थ अनेक प्रचारसभा घेतल्या आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी ताहिरला अटींसह 6 दिवसांचा कस्टडी पॅरोल मंजूर केला होता. ताहिर 3 फेब्रुवारीपर्यंत दिवसभर प्रचारासाटी तुरुंगातून बाहेर पडू शकणार आहे.
सकाळी 6 वाजता तिहार तुरुंगातून बाहेर पडल्यावर ताहिर हा पोलिसांचे वाहन अन् मोठ्या बंदोबस्तात मुस्तफाबाद येथील एआयएमआयएमच्या कार्यालयात पोहोचला. तेथे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी त्याचे स्वागत केले. यानंतर त्याने समर्थक तसेच लोकांना संबोधित केले आहे.
माझ्याकडे बोलण्यासाठी खूप काही आहे, परंतु वेळ नाही. 5 वर्षेमी उंच भिंतींच्या पलिकडील कोठडीत कशी काढली आहेत हेच मी जाणतो. केवळ लोकांचे प्रेम अन् त्यांच्यासोबतचे नाते निभावण्यासाठी न्यायालयाने मला संधी दिली आहे. माझ्याकडे शब्द भरपूर आहेत, परंतु पुरेसा वेळ नाही. मी अधिक बोलू शकणार नाही, केवळ माझ्या अश्रूंची लाज राखा, असे आवाहन ताहिरने केले आहे.