Rahul Gandhi : चौकटीबाहेर विचार करा : राहुल गांधी
esakal February 20, 2025 02:45 PM

नवी दिल्ली : ‘‘यंदाच्या वर्षात फार निवडणुका नसल्याने पक्षसंघटनाला महत्त्व द्यावे. चौकटीबाहेर विचार करत पक्षबांधणी करावी लागेल,’’ असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी आज पक्षाच्या प्रभारी आणि सरचिटणीसांच्या बैठकीत केले.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही याच मुद्द्यावर भर देत पक्षामध्ये संघटनात्मक बदल करण्याचे सूतोवाच केले. यापुढील काळात काँग्रेसमध्ये प्रदेश मुख्यालय ते बूथपर्यंत पक्षसंघटन बळकट करण्याची आणि आपापल्या राज्यांमधील पक्षसंघटनेची व आगामी निवडणुकांच्या निकालांची जबाबदारी प्रभारींवरच असेल, अशा स्पष्ट इशाराही खर्गे यांनी दिला.

काँग्रेसच्या नव्या मुख्यालयामध्ये आज पक्षाचे सरचिटणीस व प्रभारींची बैठक मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य नेत्यांच्या उपस्थितीत झाली. मागील आठवड्यात बिहार हिमाचल प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेशसह १४ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांचे प्रभारी बदलण्यात आले होते. नवनियुक्त प्रभारीदेखील या बैठकीला उपस्थित होते.

यावेळी राहुल गांधी यांनी संघटना बळकटीसाठी ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करायला सांगितल्याचे काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. राहुल गांधी म्हणाले,‘‘२०२५-२६ या वर्षात निवडणुका नाहीत. त्यामुळे हे वर्ष पूर्णपणे संघटना बांधणीसाठी द्यावे. प्रत्येक वेळी निवडणूक हरतो आणि नंतर त्यावर चर्चा होते.

हे करण्याऐवजी आता वेगळ्या पद्धतीने संघटनाबांधणी करून पुढे जावे लागेल,’’ असे राहुल यांनी सांगितले. लोकसंपर्कावर भर देण्याची सूचनाही त्यांनी केली. सर्व प्रभारींना नवे मुख्यालय असलेल्या ‘इंदिरा भवन’मध्ये कार्यालये देण्यात आली आहेत. त्यांनी कार्यालयांमध्ये नियमितपणे बसावे आणि पक्षनेतृत्वाला दर तीन महिन्यांनी आपल्या कामाचा अहवाल सादर करावा, असेही राहुल गांधी यांनी सांगितल्याचे समजते.

पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना खर्गे म्हणाले,‘‘आगामी काळात संघटनेत आणखी बदल होतील. प्रदेश मुख्यालय ते बूथपर्यंत पक्ष संघटना बळकट करण्याची जबाबदारी प्रभारींची असेल आणि त्यासाठी प्रभारींनी जातीने मेहनत करावी, कार्यकर्त्यांशी संवाद साधावा. या प्रक्रियेमध्ये काँग्रेसच्या ‘इंटक’सारख्या संलग्न संघटनांनाही सहभागी करून घ्यावे व आतापर्यंत संधी न मिळालेल्या परंतु उपयुक्त अशा कार्यकर्त्यांना पुढे आणावे.

बऱ्याचदा पक्षवाढीसाठी घाईघाईने बऱ्याच लोकांना पक्षात प्रवेश दिला जातो. परंतु वैचारिक बांधिलकी नसलेले लोक अडचणीच्या काळात पळ काढतात. ‘असल फिसल पडे और नकल निकल पडे’ या प्रकारापासून पक्षाने दूर रहावे.’’ सत्ताधाऱ्यांकडून मतदारयाद्यांमध्ये फेरफार होत असल्याच्या आरोपांचा पुनरुच्चार करताना मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा गडबडघोटाळा कोणत्याही परिस्थितीत थांबवायला हवा, असे आवाहन केले.

आयुक्तनिवडीवरून टीका

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीवरूनही खर्गे यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड समितीमध्ये सरन्यायाधीशांचा समावेश करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींनी त्यांनाही बाहेरचा रस्ता दाखवला. सरकारला सरन्यायाधीशांच्या निष्पक्षपातीपणावर विश्वास उरलेला नाही. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होण्याआधीच सरकारने मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक केली,’’ अशी बोचरी टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.

इंदिरा गांधींची आठवण

प्रियांका गांधींनीदेखील बोलताना लोकसहभाग असलेल्या कार्यक्रमांमध्ये आवर्जून हजेरी लावणे आणि त्यातून संपर्क वाढविणे याबाबतची सूचना केल्याचे समजते. ही सूचना करताना प्रियांका गांधींनी लहानपणी आजी इंदिरा गांधीसोबत रामलीला कार्यक्रम, यात्रा, उरुस यामध्ये जाणे आणि त्यातून लोकांशी जोडले जाणे कसे सुलभ होत असे, असे उदाहरण दिल्याचे सूत्रांनी सांगितले

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.