नागपूर : तब्बल १२ वर्षानंतर मध्यप्रदेशातील बहेलिया शिकारी पुन्हा एकदा राज्यात सक्रिय झाले आहेत. या शिकारी जमातीचा म्होरक्या अजित राजगोंड याला महाराष्ट्र वनविभागाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईनंतर राज्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.
राज्यातील सहाही व्याघ्र प्रकल्प, अभयारण्य व प्रादेशिक क्षेत्रातील जंगलात दिवस-रात्र गस्त वाढवा, गावाच्या शेजारील नव्याने वास्तव्यात असलेल्या नागरिकांची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
अजित हा वाघांच्या शिकारीत तरबेज आहे. मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तब्बल १२ वर्षानंतर अजित विदर्भात परत आल्यामुळे मध्य भारतातून किमान दहा वाघांची शिकार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
२०१३ मध्येही अशा पद्धतीने वाघांच्या शिकारीचे प्रमाण वाढले होते. तोच विळखा वैदर्भीय जंगलातील वन्यजीवांना घट्ट बसला असल्याचे बोलले जात आहे. बहेलिया शिकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्र आणि वन्यजीवच नव्हे तर प्रादेशिक वन विभागालाही आपल्या कवेत घेतले असल्याची चर्चा आहे. यामुळे वन विभागच नव्हे तर राज्य सरकारही शिकारीबद्दल गंभीर झाले. शिकारीवर निर्बंध लावण्याचे आव्हान आता पुन्हा एकदा वनविभागासमोर आलेले आहे.
काय आहे बहेलिया शिकाऱ्यांचा इतिहास?बहेलिया शिकारी जमात मूळची मध्य प्रदेशातील कटनी जिल्ह्यातील आहे. वाघांच्या शिकारीत त्यांचा हातखंडा आहे. शिकारीसाठी विशिष्ट पद्धतीचा सापळा ते वापरतात. बहेलिया समाजातील संघटित टोळ्या स्टीलच्या जबड्याचे सापळे वापरण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे सापळे ‘बहेलिया ट्रॅप’, ‘कटनी ट्रॅप’ म्हणूनही ओळखले जातात.
अनेक वाघ बेपत्ता!राज्यातून आणि विशेषतः: विदर्भातून गेल्या एक-दोन वर्षात अनेक वाघ बेपत्ता झाल्याचे पर्यटकांचे म्हणणे आहे. पेंचमध्ये अलीकडेच ज्या दोन बछड्यांचा उपासमारीने मृत्यू झाला, त्यांची आई बेपत्ता आहे. ताडोबातील जगप्रसिद्ध वाघीण माया बेपत्ता आहे. आतापर्यंत अजितच्या भ्रमणध्वनीवरून सुमारे ७० लाख रुपयांचे आर्थिक व्यवहार समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे या वाघांचीही तर शिकार झाली नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
वाघाच्या शिकारीवर निर्बंध लावण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या वास्तव्यात असलेले वैदू, तंबूत राहणाऱ्या नागरिकांची जनजागृती केली जात आहे. पोलिस पाटलांनाही सक्रिय केले असून गावात नवीन येणाऱ्यांची नोंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. संशयास्पद व्यक्तीचीही चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
डॉ. प्रभू नाथ शुक्ल, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प