-बलराज पवार
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीतील खानापूर तालुक्यात करण्याचा ठराव विद्यापीठाच्या अधिसभेत झाला आहे. त्याला वर्ष उलटून गेले, तरीही या उपकेंद्राच्या स्थापनेला गती आलेली नाही. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गतवर्षी सांगलीत विद्यापीठाचे उपकेंद्र करण्याचा निर्णय दोन मिनिटांत घेऊ, असे स्पष्ट केले होते, त्यालाही वर्ष उलटले आहे. आता ते स्वतः सांगलीचे पालकमंत्री झाले आहेत. त्यामुळे विद्यापीठ उपकेंद्राच्या उभारणीस ते गती देतील, अशी अपेक्षा आहे.
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यात होण्यासाठी गेल्या सात वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. तत्कालीन कुलगुरू आणि तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्यात याबाबत चर्चा झाली होती. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली होती. मात्र, त्याला गती येत नाही. विद्यापीठाच्या अधिसभेत वर्षभरापूर्वी या उपकेंद्राचा ठराव करण्यात आला. यामध्ये खानापूर तालुक्यात शंभर एकर जागेत हे उपकेंद्र उभारण्याचा निर्णय झाला आहे. त्यानंतर प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपकेंद्र समितीची स्थापना झाली.
समितीने तयार केलेला प्रस्ताव विद्यापीठाने मंजूर करून राज्य शासनाकडे पाठवला आहे. त्याला आता वर्ष होत आले आहे. त्यावर राज्य शासनाकडून अद्याप उत्तर आलेले नाही. त्यामुळे अधिसभेने ठराव करूनही उपकेंद्राचा प्रस्ताव लटकलेला आहे.
पालकमंत्री गती देणार का?उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे गतवर्षी सांगलीत उद्योग प्रदर्शनासाठी आले असता त्यांनी शिवाजी विद्यापीठाकडून सांगलीला उपकेंद्र उभारण्याचा प्रस्ताव आल्यास दोन मिनिटांत मंजूर करू, असे आश्वासन दिले होते. मात्र त्यांच्याकडूनही यावर अद्याप हालचाल झालेली नाही. आता पालकमंत्रिपदाची सूत्रे त्यांच्याकडे आली आहेत. त्यामुळे त्यांनी यात लक्ष घालून हा प्रस्ताव मार्गी लावावा, अशी अपेक्षा आहे.
उपकेंद्राची आवश्यकता का?शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा हे तीन जिल्हे येतात. सांगली जिल्ह्यामधील ८७ महाविद्यालये शिवाजी विद्यापीठाशी संलग्नित आहेत. यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान, शिक्षणशास्त्र, अभियांत्रिकी व आर्किटेक्ट, औषधनिर्माण शास्त्रे, विधी, शारीरिक शिक्षण महाविद्यालयांमधील विद्यार्थी संख्या ६३ हजार ५७० आहे. सांगली जिल्ह्यातील काही भौगोलिक भाग हा दुष्काळी आहे. या भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी शिवाजी विद्यापीठाचे अंतर हे दूर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भार, वेळेचा अपव्यय आदी गोष्टींचा सामना करावा लागतो. अनेक महाविद्यालये खानापूरपासून तुलनेने कमी अंतरावर आहेत. सातारा जिल्ह्यातील काही महाविद्यालयांसाठीही खानापूर हे केंद्र अंतराच्या दृष्टीने अतिशय सोयीचे होणार आहे. शिवाय, शिवाजी विद्यापीठावरील जो प्रशासकीय व अन्य कामाचा जो भार आहे, तो कमी केला जाऊ शकेल. त्यामुळे हे उपकेंद्र आवश्यक आहे.
विद्यापीठाने सादर केलेला प्रस्तावशिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने सांगली उपकेंद्रासाठी प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील समिती नियुक्त केली आहे. समितीने सांगली जिल्ह्यातील उपकेंद्रासाठी खानापूर येथील जागेला प्रत्यक्ष भेट देऊन खानापूर येथील जागा गट क्रमांक ५७२/१, क्षेत्रफळ ४२.५६ हेक्टर आर. गायरान जमीन निश्चित केली आहे. तेथे शिक्षक, कर्मचारी, इमारत व अन्य सोयी-सुविधांसाठी आवश्यक १४१ कोटी २१ लाख ३९ हजार रुपयांचा प्रस्ताव तयार करून समितीने १५ जानेवारी २०२४ रोजी सर्व बाबींचा विचार करून शिवाजी विद्यापीठास अहवाल सुपूर्द केला आहे. या अहवालास शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ५ फेब्रुवारी २०२४ रोजी मंजुरी दिली. त्यानंतर राज्य शासनाला विद्यापीठाने खानापूर येथे उपकेंद्र सुरू करावे, यासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे.
भाडेपट्ट्यावर तात्पुरते केंद्र सुरू करावेदरम्यान, उपकेंद्र सुरू होईपर्यंत सांगलीत भाड्याने जागा घेऊन विद्यापीठाचे कोर्सेस सुरू करावेत, असाही ठराव करण्यात आला होता. त्यासाठी महापालिकेने एका शाळेची जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. तसेच ‘बीएसएनएल’नेही शहरातील जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यावरही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विचार करावा.
सांगलीत खानापूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्याबाबत गतवर्षीच प्रस्ताव शासनाला सादर केला आहे. हे केंद्र सुरू होईपर्यंत भाड्याने जागा घेऊन सांगलीत उपकेंद्राचे काम सुरू करावे, अशीही आमची मागणी आहे. त्यासाठी महापालिका, ‘बीएसएनएल’ने जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. याचा निर्णय लवकर झाल्यास विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.
- संजय परमणे, सदस्य, विद्यापीठ अधिसभा व उपकेंद्र समिती