Economic Survey 2024-25: आर्थिक सर्वेक्षण म्हणजे काय? अर्थसंकल्पापूर्वी हा अहवाल का सादर केला जातो?
esakal January 30, 2025 10:45 PM

Economic Survey 2024-25: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी संसदेत 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पात सहसा पुढील आर्थिक वर्षातील कामांचा आणि योजनांवरील खर्चाचा तपशील असतो.

पण अर्थसंकल्पापूर्वी सरकार संसदेत आणखी एक दस्तावेज सादर करते. त्याचे नाव आहे इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजेच आर्थिक सर्वेक्षण. अर्थसंकल्पापूर्वी आलेला हा दस्तऐवज इतका महत्त्वाचा का आहे? ते जाणून घेऊयात.

आर्थिक सर्वेक्षण हे खरे तर सरकारचे कामगिरीचे प्रमाणपत्र असते. हा दस्तऐवज सरकारच्या मागील अर्थसंकल्पाचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला हे सांगते. हा केवळ सरकारच्या कामगिरीचा अहवाल नाही तर देशाच्या अर्थव्यवस्थेच्याही कामगिरीचा अहवाल असतो.

आर्थिक सर्वेक्षणात देशाच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीची तपशीलवार माहिती असते. एवढेच नाही तर अर्थव्यवस्थेतील 3 प्रमुख क्षेत्रे, प्राथमिक (शेती आणि इतर संबंधित व्यवसाय), दुय्यम (उत्पादन) आणि सेवा क्षेत्र (आयटी आणि लॉजिस्टिक्स इ.) यांच्या परिस्थितीचीही माहिती असते. यामध्ये देशातील कोणते क्षेत्र कोणत्या दिशेने जात आहे, त्यामध्ये पूर्वी कोणता ट्रेंड होता आणि आगामी काळात कोणता ट्रेंड दिसतो हे सांगितले जाते.

अर्थव्यवस्थेत भविष्यात काय घडू शकते, याचा अंदाजही आर्थिक सर्वेक्षणातून दिला जातो. तसेच महागाई, जागतिक व्यापार, भौगोलिक-राजकीय परिस्थिती आणि जागतिक अर्थव्यवस्थेचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम याची रूपरेषाही यात आहे. समाजाच्या कोणत्या भागाला अर्थव्यवस्थेचा फटका बसत आहे आणि कोणत्या भागासाठी अधिक कामाची गरज आहे हे देखील हा अहवाल सांगतो.

आर्थिक सर्वेक्षण कधी सादर होते?

आर्थिक सर्वेक्षण संसदेत मांडले जाते. हे नेहमी बजेट सादर होण्याच्या एक दिवस आधी येते. यापूर्वी देशातील सर्वसाधारण फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात होता आणि आता तो फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी सादर केला जातो. त्यामुळे आता देशातील आर्थिक सर्वेक्षण 31 जानेवारीला येणार आहे. या वर्षी आर्थिक सर्वेक्षण 2024-25 31 जानेवारी 2025 रोजी संसदेत सादर केले जाईल.

देशाचे आर्थिक सर्वेक्षण कोण तयार करते?

देशाचा आर्थिक विभाग दरवर्षी आर्थिक आढावा तयार करतो. या संपूर्ण प्रक्रियेचे प्रमुख देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. अर्थमंत्री ते सकाळी संसदेत मांडतात आणि त्याच दिवशी संध्याकाळी मुख्य आर्थिक सल्लागार तो पत्रकारांसमोर मांडतात.

यंदा ही जबाबदारी व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या खांद्यावर असेल. त्यामुळे उद्या येणाऱ्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

आर्थिक सर्वेक्षण: कधी आणि कुठे पाहता येणार?

आर्थिक सर्वेक्षण संसद टीव्ही आणि पीआयबी इंडिया चॅनेलवर थेट पाहता येईल. याव्यतिरिक्त, वित्त मंत्रालयाच्या Facebook पेजवर आणि त्यांच्या अधिकृत X हँडलवर (@FinMinIndia) देखील पाहता येईल. सर्वेक्षण प्रकाशित झाल्यानंतर, ते भारताच्या बजेट वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते. 2023-24 साठी मागील आर्थिक सर्वेक्षण निर्मला सीतारामन यांनी 22 जुलै 2024 रोजी सादर केले होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.