अमेरिकेत मोठी दुर्घटना घडली आहे. अमेरिकन एअरलाइन्सच विमान धावपट्टीवर उतरण्याच्या काही क्षण आधी लष्काराच्या हेलिकॉप्टरला धडकले. या दुर्घटनेत आत्तापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार ३० जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. या धडकेत विमान आणि हेलिकॉप्टर पोटोमॅक नदीत कोसळलं असल्याने नदीत बचावकार्य वेगाने सुरू आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार क्रू मेंबर्ससह ६४ जण विमानातून प्रवास करत होते, तर हेलिकॉप्टरमध्ये तीन जणं होते. या दुर्घटनेचे व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत काही स्केटिंग क्रीडा प्रकारात नाव गाजवलेले सदस्यही असल्याची माहिती समोर आली आहे.
मिडिया रिपोर्ट्सनुसार युनायटेड स्टेट्स फिगर स्केटिंग असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे खेळाडू, प्रशिक्षक आणि त्यांचे कुटुंबिय या प्रवास करत होते. ते सदस्य विचिटा येथील यूएस चॅम्पियनशिपच्या संयोगाने आयोजित केलेल्या नॅशनल डेव्हलपमेंट कॅम्पवरून परत येत होते.
मिळालेल्या माहितीनुसार स्केटिंगच्या संबंधित साधारण १५ जणं या विमानात होते. या सर्वांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
रशियातील मिडिया रिपोर्ट्सनुसार रशियाचे माजी वर्ल्ड चॅम्पियन आणि आईस स्केटिंग प्रशिक्षक इव्हगेनिया शिश्कोवा आणि वदिम नौमोव्ह हे देखील विमानात होते. त्यांच्या जोडीने १९९४ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकली होती. त्यांनी लग्नही केले असून हे पती-पत्नी नंतर १९९८ पासून अमेरिकेत स्केडिंगचे प्रशिक्षक म्हणून काम करत होते.
याशिवाय सोव्हिएतची माजी स्केटर इन्ना वोलियान्स्काया देखील या विमानात असल्याचे सांगितले जात आहे.
विमान आणि हेलिकॉप्टरची धडक ४०० फूट उंचावर झाल्याचे सांगितलं जात आहे. तसेच या दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.