ती एक माघातली प्रसन्न सकाळ होती. नेमकी तीथ सांगावयाची तर क्रोधी संवत्सरातील श्रीशके १९४६ ची माघ शु. प्रतिपदा. इये दिशी राजियांना क्रांतिकारक शोध लागला…
‘शिवतीर्था’वरील बालेकिल्ल्यातून भर सकाळी ‘युरेका, युरेका, सापडलं बरं का!’ ऐशा गगनभेदी आरोळ्या उठल्या. वळचणीला आणि कट्ट्याला गुटरगुं करणारी कबुतरे अस्मानात उडाली. मैदानातल्या उरल्यासुरल्या जागेत क्रिकेटचा डाव मांडू पाहणारे उद्याचे सचिन तेंडुलकर प्यांटीतच दचकले!
‘युरेका, युरेका!,’ पुन्हा एकवार आरोळी उमटली. नवनिर्माणाच्या कार्यास वाहोन घेतलेले काही कदीम शिपाईगडी लगोलग बालेकिल्ल्याकडे धावले. ‘काय झालं, काय झालं?’ ऐसी पृच्छा एकमेकांस करू लागले.
शिवतीर्थाच्या पायथ्याशी जमा होवोन चहाचा घुटका घेणारे निष्ठावंत शिलेदार भराभरा वर धावले. बालेकिल्ल्यातील अंत:पुरात साक्षात राजेसाहेब गवाक्षाकडे उभे राहोन दोन्ही हात अस्मानाकडे पसरोन गर्जना करत होते, ‘युरेका, युरेका!’
‘कशापायी याद केलीत, साहेब?,’ मुजरा करीत बाळाजीपंत अमात्य अदबीने म्हणाले. त्यांच्यासोबत इतर शिलेदारही उभे होते…
‘युरेका, युरेका!,’ राजेसाहेब पुन्हा एकदा ओरडले.
‘हो का, हो का?,’ बाळाजीपंतांनी आश्चर्याने विचारले.
‘गेले कैक दिवस आम्ही चिंतेत होतो, व्यग्र होतो, उद्विग्न होतो!’ राजेसाहेब तडफेने सांगो लागले. त्यातले बरेचसे महाराष्ट्र सैनिकांच्या मस्तकावरोन वाहोन गेले. आपले साहेब टेन्शनमध्ये आहेत, येवढेच त्यांना कळले, तेवढे पुरेसे होते.
‘आम्ही जंग जंग पछाडले, शोध शोध शोधिले, पहा पहा पाहिले, पण म्हंटात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा,’ राजेसाहेब भयंकर म्हंजे भयंकर उत्तेजित होत्साते म्हणाले.
‘काही गहाळ झाले का, साहेब?,’ एका शिलेदाराने मनसे याने की मनापासोन विचारले.
‘कुठेही सांपडेना म्हणोन आम्ही इतके अस्वस्थ होतो की साधा बटाटावडा आम्हांस गोड लागेनासा झाला होता. आम्ही जणू मौनात गेलो होतो… आम्हीच काय संपूर्ण महाराष्ट्राचा मुलुख च्याटंच्याट पडोन दातखीळ बसोन चिप्पटमुखाने थंडगार पडोन होता!’ राजेसाहेब तावातावाने सांगो लागले. च्याटंच्याट, दातखीळ, चिप्पटमुख या शब्दांमुळे उपस्थितांची बोलतीच बंद जाहाली होती…
‘मिसिंग रिपोर्ट धिला का?,’ दुसऱ्या एका शिलेदाराने शंका काढली, आणि नंतर अनाहूतपणे ‘ओय’ असे उद्गार काढले. त्याची चूक नव्हती. शेजारील शिलेदाराने त्यास चिमटा काढला होता.
‘अखेर आम्हाला गवसले, अगदी अचूक गवसले!,’ राजेसाहेबांनी जाहीर केले. पण काय गवसले हे उपस्थितांना कळेना.
‘क…क…काय गहाळ झाले होते साहेब? आधी बोलला असता तर सारा महाराष्ट्र पिंजोन काढून गहाळ चीजवस्त समोर आणून ठेविली असती,’ बाळाजीपंतांनी विनम्रपणे म्हटले.
‘निवडणुकांमध्ये आपल्याला प्रचंड मतदान झालं होतं! अगदी महाप्रचंड! हे तुम्हाला ठाऊक आहे का, बाळाजीपंऽऽऽत!,’ गर्रकन मान वळवोन राजेसाहेबांनी जाब विचारला. आपल्या पार्टीला प्रचंड मतदान कधी बरे झाले होते, हे बाळाजीपंत आठवो लागले. टोटल लागेना!
‘महाराष्ट्राच्या जनतेनं आपल्याला मतदान केलं होतं, ही काळ्या फत्तरावरची रेघ! अगदी निर्विवाद मतदान केलं होतं, पण…पण ते कुठं तरी मधल्यामध्ये गहाळ झालं,’ राजेसाहेबांनी गौप्यस्फोट केला.
‘कुठं गहाळ झालं, साहेब?,’’ एका शिलेदाराने अधीरतेने विचारले.
‘सांगितलं ना, मधल्यामध्ये गहाळ झालं! आता ते शोधत बसू नका, मतदान झालं होतं, येवढंच लक्षात ठेवा! काय?..,’ राजेसाहेबांनी उत्तर दिले.
पडत्या फळाची आज्ञा मानून महाराष्ट्र सैनिकांनी मुजरा घातला आणि तेथून काढता पाय घेतला. ‘हे ‘मधल्यामध्ये’ म्हंजे कुठंशी आलं?’ असे एक म. सैनिक दुसऱ्या म. सैनिकाला कानात विचारत होता. पण उत्तरादाखल त्याने त्यास पुन्हा चिमटा काढला.