अमरावती - घर का विकले, आता प्लॉट तरी विकू नका, या मुद्द्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. रागाच्या भरात पतीने पत्नीला डोक्यावर जबर मारहाण केली व त्यानंतर गळा दाबून तिचा खून केला आहे.
चांदूरबाजार परिसरात साईनगरात रविवारी (ता. २३) ही घटना घडली. मेघा बाबूराव काळे (वय-३६, रा. साईनगर, चांदूरबाजार), असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असल्याची माहिती चांदूरबाजारचे ठाणेदार सूरज बोंडे यांनी दिली. पती-पत्नीमध्ये गत काही दिवसांपासून प्लॉट विकण्यावरून वाद सुरू होता.
नेहमीच भांडणे व्हायची. अखेर रविवारला रागाच्या भरात पती बाबूराव ज्ञानेश्वर काळे (वय ५२) याने पत्नीच्या डोक्यावर जबर मारहाण करून जखमी केले. तेवढ्यावर पतीचे समाधान न झाल्याने पतीने पत्नी मेघा हिचा गळा दाबून जीव घेतला. सचिन प्रभाकर अढाऊ (वय ३६, रा. आष्टोली) यांनी चांदूरबाजार ठाण्यात तक्रार केली.
त्या आधारे चांदूरबाजार पोलिसांनी संशयित बाबूराव ज्ञानेश्वर काळे विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. सोमवारी (ता. २४) चांदूरबाजार पोलिसांनी अटक संशयित पतीस न्यायालयासमोर हजर केले.