ठाणे : ‘‘शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. त्यांना‘महाबंडलेश्वर’ म्हणून मी उपाधी दिली आहे. ‘मातोश्री’बाबत गाड्यांचा विषय असेल, तो आजचा नाही. यापूर्वी नारायण राणे यांनीदेखील अशाच पद्धतीचे आरोप केले होते. केवळ चुकीच्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करण्याचे काम राऊत यांच्याकडे उरले आहे. आता शरद पवार यांच्यावरही आरोप करत आहेत,’’ अशी टीका ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी सोमवारी केली.
नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांना मर्सिडिज दिली की पदे मिळत असल्याचे वक्तव्य केले होते. यावरून ठाकरे गटाने केलेली कामे दाखवू शकत नाही. त्यामुळे खालच्या स्तरावरची वक्तव्ये करत माध्यमांसमोर ते चमकोगिरी करीत आहेत, अशी टीका राऊत यांच्यावर करताना म्हस्के यांची जीभ घसरली.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याने नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात त्यांच्या पक्षाच्या महिला शिवसैनिकांनी आंदोलन केले.