गुंतवणूकदारांसाठी आठवड्याचा पहिलाच दिवस ब्लॅक डे ठरला, 435000 कोटी बुडाले, FPI ची विक्री सुरुच
Marathi February 25, 2025 12:25 PM

मुंबई : भारतीय शेअर बाजारात  गेल्या पाच महिन्यांपासून सुरु असलेली घसरण कायम आहे. सोमवारी भारतीय शेअर बाजारातील सर्व निर्देशांक 1 टक्क्यांनी घसरुन आठ महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचले. यामुळं भारतीय गुंतवणूकदारांचे 435000 कोटी रुपयांची घसरण झाली. यामुळं गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला.

नॅशनल स्टॉक एक्सचेंजवरील उलाढाल 71947.32 कोटी रुपयांची झाली, जी गेल्या चार महिन्यातील सर्वात कमी होती. सरासरी दैनंदिन उलाढाल 15 महिन्यांच्या निचांकी पातळीवर  पोहोचली होती. 24 फेब्रुवारीला ती 88861.90 कोटी रुपये होती. त्यात आणखी घसरण झाली.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून भारतीय बाजारातील त्यांच्या समभागांच्या विक्रीचं सत्र सुरुच आहे. सोमवारच्या बाजाराच्या सत्रात विदेशी गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडून 6286.70 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर भारतीय गुंतवणूकदारांनी 5185.66 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

सोमवारी निफ्टी 50 बंद झाला तेव्हा 22553.35 अंकांवर पोहोचला होता. निफ्टी 50 मध्ये 1.06 टक्क्यांची घसरण झाली. तर, बीएसई सेन्सेक्स 1.1 टक्क्यांनी घसरुन 74454.41 वर पोहोचला आहे. निफ्टी मिडकॅप 100 हा निर्देशांक 0.9 अंकांनी घसरला आहे. निफ्टी स्मॉल कॅप 250 हा निर्देशांक 1.2 टक्क्यांनी घसरला.

निफ्टी 50 गेल्या तीन महिन्यातील सर्वात दुसरी खराब कामगिरी करणारा निर्देशांक ठरला आहे. निफ्टी 50 हा निर्देशांक 5.6 टक्क्यांनी घसरला. तर, जकार्ताच्या कम्पोझिटमध्ये 6.2 टक्क्यांची घसरण झाली.

निफ्टी स्मॉल कॅप 250 अंकांच्या उच्चांकी पातळीवरुन 22 टक्क्यांनी घसरला आहे. तर, निफ्टी मिडकॅप उच्चांकापासून 18 टक्क्यांनी घसरला आहे.  निफ्टी 50 उच्चांकी पातळीपासून  14 टक्क्यांनी तर, सेन्सेक्स उच्चांकी पातळीपासून 13 टक्क्यांनी घसरला आहे.

तज्ज्ञांच्या मतानुसार अतिरिक्त मूल्यांकन,  कॉर्पोरेट कंपन्यांची तिसऱ्या तिमाहीतील कमजोर कामगिरी, विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून होणारी विक्री हे देखील शेअर बाजारातील घसरणीला कारणीभूत आहे.  डॉलरचं मजबूत होणं यासह अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून राबवली जाणारं आक्रमक व्यापार धोरण याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर झाल्याचं दिसून आलं.

मार्सेलस इन्वेस्टमेंट मॅनेजमेंटचे प्रमुख गुंतवणूक अधिकारी आणि संस्थापक सौरभ मुखेरेजा यांनी स्मॉल कॅप आणि मिड कॅप पेक्षा लार्ज कॅप शेअर कमी खर्चिक असल्याचं म्हटलं.

दरम्यान, निफ्टी 50 चा सध्याचं प्राईस टू इर्निंग  गुणोत्तर 21.06 इतकं आहे. हे गेल्या पाच वर्षातील 23.91 या सरासरीच्या खाली आहे.

इतर बातम्या :

Stock Market : एनटीपीसी ग्रीन एनर्जी ते एलआयसी यासह ‘पाच’ स्टॉकवर लक्ष ठेवा, बाजारात घडामोडी वाढण्याची शक्यता, कारण…

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.