सद्गुरू - ईशा फाउंडेशन
सद्गुरू : शिवाला नेहमी त्र्यंबक म्हणून संबोधले जाते, कारण त्याला तिसरे नेत्र आहे. तिसरे नेत्र हे दिव्यदृष्टीचे नेत्र आहे. दोन भौतिक डोळे हे केवळ संवेदी अवयव आहेत. ते मनात सर्व प्रकारच्या निरर्थक गोष्टी भरवतात कारण तुम्ही जे बघता ते सत्य नसते. तुम्ही या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीला पाहता आणि त्याच्याबद्दल काहीतरी विचार करता, पण तुम्हाला त्याच्यातील शिव पाहता येत नाही. हे दोन डोळे खरोखर सत्य पाहत नाहीत. म्हणून एक वेगळा डोळा, सखोल भेद करणारा डोळा, उघडला गेला पाहिजे.
या देशात, या परंपरेत, जाणणे म्हणजे पुस्तके वाचणे, कुणाची भाषणे ऐकणे किंवा इथून तिथून माहिती गोळा करणे नव्हे. जाणणे म्हणजे जीवनाकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी उघडणे. म्हणून जर खरे ज्ञान मिळायचे असेल, तर तुमचे तिसरे नेत्र उघडले पाहिजे. जर दृष्टीचे हे नेत्र उघडले नाही, जर आपण केवळ संवेदी डोळ्यांपुरतेच मर्यादित राहिलो, तर शिवाची कोणतीही शक्यता निर्माण होत नाही.
महाशिवरात्रीला, एकप्रकारे निसर्ग अशी शक्यता खूप जवळ आणत आहे. हे रोज शक्य आहे, यासाठी विशिष्ट दिवसाची वाट पाहण्याची गरज नाही. परंतु या दिवशी, निसर्ग तुमच्यासाठी हे अधिक प्रमाणात उपलब्ध करून देतो कारण ग्रहांच्या स्थिती अशा असतात, की ऊर्जा, विशेषतः पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात, एखाद्या व्यक्तीला त्याची ऊर्जा वरच्या दिशेने नेणे खूप सोपे ठरते. म्हणून या दिवसासाठी एक सूचना अशी आहे की, तुम्ही आडव्या स्थितीत पडून राहू नये. तुम्हाला उभ्या स्थितीत राहणे आवश्यक आहे. केवळ उभ्या स्थितीत राहणे पुरेसे नाही. जर आपण स्वतःला अशा स्थितीत ठेवू शकलो, की ज्यामुळे आपण आपल्या ‘स्व’ऐवजी ‘त्याला’ असू दिले, जर तुम्ही अशा प्रकारे झालात, तर जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी उघडण्याची आणि जीवनाकडे संपूर्ण स्पष्टतेने पाहण्याची शक्यता उपलब्ध होते.
कितीही मोठ्या प्रमाणात केलेले विचार आणि तत्त्वज्ञान, तुमच्या मनात कधीही स्पष्टता आणणार नाहीत. तुम्ही तयार केलेली तार्किक स्पष्टता कोणीही बिघडवू शकतो. फक्त दृष्टी उघडल्यावरच, फक्त तुमच्याकडे अंतर्दृष्टी असल्यावरच, परिपूर्ण स्पष्टता निर्माण होईल. मग या जगातील कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही परिस्थिती तुमच्या आतील ही स्पष्टता बिघडवू शकणार नाही. म्हणून महाशिवरात्री ही तुम्हाला त्र्यंबक होण्याची संधी आहे, तुमचे तिसरे नेत्र उघडण्याची आणि स्वतःसाठी नवीन दृष्टी प्राप्त करण्याची संधी आहे. अशी शक्यता या दिवशी उपलब्ध आहे.