Champions Trophy: पाकिस्तानचा खेळ खल्लास! न्यूझीलंडच्या विजयासह भारत सेमीफायनलमध्ये; बांगलादेशही OUT
esakal February 25, 2025 06:45 AM

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत न्यूझीलंडने सोमवारी बांगलादेशला ५ विकेट्सने पराभूत केलं. हा न्यूझीलंडचा सलग दुसरा विजय ठरला. त्यामुळे न्यूझीलंडने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे.

न्यूझीलंडच्या विजयामुळे भारतीय संघाच्या उपांत्य फेरीतील स्थानावरही शिक्कामोर्तब झाले आहे. कारण आता पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी प्रत्येकी २ सामने पराभूत झाले आहेत आणि त्यांचा आता एकच सामना एकमेकांविरुद्ध राहिला आहे. न्यूझीलंडच्या विजयात रचिन रवींद्र आणि मायकल ब्रेसवेल यांचे मोलाचे योगदान राहिले.

या सामन्यात विजयासाठी २३७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग न्यूझीलंडने ४६.१ षटकात ५ विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. न्यूझीलंडकडून रचिनने शतक केलं, तर टॉम लॅथमने अर्धशतकी खेळी केली. ब्रेसवेलने ४ विकेट्स घेतल्या.

२३७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलमीला विल यंग आणि डेवॉन कॉनवे उतरले होते. पण पहिल्याच षटकात यंगला तस्किन अहमदने शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर चौथ्याच षटकात केन विलियम्सननही ५ धावांवर बाद झाला. त्यामुळे न्यूझीलंडला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले.

पण कॉनवेला साथ देण्यासाठी चौथ्या क्रमांकावर रचिन रवींद्र उतरला. त्याने कॉनवेसोबत अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला.

मात्र कॉनवेला १६ व्या षटकात ३० धावांवर मुस्तफिजूरने बाद करत न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. परंतु, रचिनने अनुभवी खेळाडू टॉम लॅथमच्या साथीने न्यूझीलंडचा डाव उभा केला. त्या दोघांनी न्यूझीलंडला विजयी मार्गावर नेले. रचिनने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर धावांची गतीही वाढवली. त्याने ९५ चेंडूतच त्याचे चौथे वनडे शतक पूर्ण केले.

त्याबरोबरच त्याने लॅथमसह देखील चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.अखेर त्याचा अडथळा रिशाद हुसैनने दूर केला. त्याने बदली क्षेत्ररक्षक परवेझ हुसैन इमॉनच्या हातून त्याला झेलबाद केले. रचिनने १०५ चेंडूत ११२ धावा करताना १२ चौकार आणि एक षटकार मारला.

रचिन बाद झाल्यानंतर फिलिप्स लॅथमला साथ देण्यासाठी उतरला होता. परंतु, धावा पळताना गोंधळ झाल्याने ४२ व्या षटकात लॅथम धावबाद झाला. त्याने ७६ चेंडूत ५५ धावांची खेळी केली. उर्वरित २३ धावा ग्लेन फिलिप्स आणि मायकल ब्रेसवेलने पूर्ण करत न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. फिलिप्स २१ धावांवर आणि ब्रेसवेल ११ धावांवर नाबाद राहिला.

बांगलादेशकडून गोलंदाजी करताना तस्किन अहमद, नाहिद राणा, मुस्तफिजूर रेहमान आणि रिशाद हुसैन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पुर्वी न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. बांगलादेशकडून तान्झिक हसन आणि कर्णधार नजमुल हुसैन शांतो यांनी सलामीला ४५ धावांची भागीदारी करत चांगली सुरुवात केली.

पण तान्झिदला मायकल ब्रेसवेलने बाद केले. त्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांकडूनही चांगली साथ मिळाली. त्यामुळे बांगलादेशची अवस्था ५ बाद ११८ धावा अशी झाली होती. पण एक बाजू शांतोने सांभाळली होती. त्याला जाकर अलीने साथ दिल. पण शांतो अर्धशतक केल्यानंतर ३८ व्या षटकात बाद झाला.

विल्यम ओ'रुर्कीच्या गोलंदाजीवर ब्रेसवेलने त्याचा अफलातून झेल घेतला. शांतोने ११० चेंडूत ७७ धावांची खेळी केली. जाकर अली (४५) आणि रिशाद हुसैनने (२६) थोडीफार झुंज दिली. त्यामुळे बांगलादेशने २०० धावांचा टप्पा पार करत समाधानकारक धावसंख्या उभारली. बांगलादेशने ५० षटकात ९ बाद २३६ धावा केल्या.

न्यूझीलंडकडून मायकल ब्रेसवेलने शानदार गोलंदाजी करताना १० षटकात २६ धावाच देत ४ विकेट्स घेतल्या. तसेच विल्यम ओ'रुर्कीने २ विकेट्स घेतल्या. मॅट हेन्री आणि काईल जेमिसनने प्रत्येकी १ विकेट घेतली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.