India vs England 4th T20I Match Marathi update: हार्दिक पांड्या व शिवम दुबेच्या अर्धशतकानंतर भारताच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी करून चौथी मॅच जिंकली. कन्कशन सबस्टीट्यूड म्हणून मैदानावर आलेल्या हर्षित राणाने ( Harshit Rana) त्याच्या पहिल्याच षटकात इंग्लंडला धक्का दिला. हॅरी ब्रूकने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली होती, परंतु वरूण चक्रवर्थी त्याच्या विकेटसह षटकात दोन धक्के देत मॅच फिरवली. भारताला हा सामना त्यानंतर सहज जिंकता आला अन् मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेता आली.
हार्दिक पांड्या व शिवम दुबे यांच्या वैयक्तिक अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५ बाद ७९ धावांवरून ९ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारली. साकिब महमूदने संजू सॅमसन ( १), सूर्यकुमार यादव ( ०) व तिलक वर्मा ( ०) यांना माघारी पाठवून भारताला खूप मोठा धक्का दिला होता. रिंकू सिंग ( ३०) व अभिषेक शर्मा ( २९) यांनी त्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची भागीदारी ४५ धावांवर तुटली आणि भारताची अवस्था ५ बाद ७९ अशी झली. हार्दिक व शिवम ही जोडी मैदानावर उभी राहिली नसती तर टीम इंडियावर संकट अजून वाढले असले. या दोघांनी ८७ धावांची भागीदारी केली. हार्दिकने ३० चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ५३ आणि शिवमने ३४ चेंडूत ७ चौकार व २ षटकारांसह ५३ धावा केल्या.
बेन डकेट व फिल सॉल्ट यांनी ६ षटकांत ६२ धावा फलकावर चढवल्या. पॉवर प्लेच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रवी बिश्नोईने ही जोडी तोडली. बेन डकेट १९ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ३९ धावांवर बाद झाला. पुढच्याच षटकात अक्षर पटेलने इंग्लंडचा सेट फलंदाज फिल सॉल्टचा ( २३) त्रिफळा उडवला. बिश्नोईच्या गुगलीने पुन्हा एकदा कमाल करताना फॉर्मात असलेल्या जॉस बटलरचा ( २) काटा काढून भाराताला मोठं यश मिळवून दिलं. शिवमला २०व्या षटकात ओव्हरटनने टाकलेला चेंडू हेल्मेटवर आदळला होता. त्यानंतर तो मैदानावर आला नाही. शिवमच्या जागी concussion substitute म्हणून हर्षित राणाला मैदानावर उतरवले गेले आणि हे त्याचे ट्वेंटी-२०मधील पदार्पण ठरले. त्याने लिएम लिव्हिंगस्टोनची ( ९) विकेट मिळवून देताना इंग्लंडला चौथा धक्का दिला.
त्यानंतर वरुण चक्रवर्थीने त्याच्या एकाच षटकात इंग्लंडला दोन धक्के दिले. २६ चेंडूंत ५ चौकार व २ षटकार खेचून ५१ धावांची खेळी करणाऱ्या हॅरी ब्रूकला १५व्या षटकात वरुणने बाद केले. त्यानंतर त्याच षटकात ब्रेडन कार्सला शून्यावर माघारी पाठवून त्याने इंग्लंडची कोंडी केली. हर्षितने त्याच्या दुसऱ्या षटकात जेकब बेथेलची ( ६) विकेट घेऊन भारताला सामन्यात पुनरागमन करून दिले.
त्यानंतर हर्षित व रवी यांनी विकेट्स घेतल्या. हर्षितने ३३ धावांवर ३ व रवीने २८ धावांवर ३ विकेट्स घेतल्या. इंग्लंडचा संपूर्ण संघ १९.४ षटकांत १६६ धावांत तंबूत परतला आणि भारताने १५ धावांनी हा सामना जिंकला. सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून २१ सामन्यांत १७ वा विजय मिळवला.