बैठकीची 'निवांत' खोली
esakal February 01, 2025 08:45 AM

- डॉ. राजश्री पाटील, प्राध्यापक, एसएनडीटी महिला विद्यापीठ

मुख्य दरवाजा उघडला, की बैठकीच्या खोलीत आपण प्रवेश करतो. घराचा हा दर्शनी भाग काहीसा औपचारिक म्हणावा असा असतो. स्नेही, आप्तस्वकीय; तसंच घरातल्या माणसांना एकत्र आणणारं हे ठिकाण. घराच्या या हिश्श्यावरच्या खांद्यावर जरा जास्त जबाबदारी असते; पण तिचं ओझं होऊ देऊ नये.

बैठकीची खोली, दिवाणखाना, ड्रॉइंग रूम, लिव्हिंग रूम, बाहेरची खोली, हॉल, अशा वेगवेगळ्या नावांनी या जागेला संबोधलं जातं. कालमानाप्रमाणे ही संबोधनं बदलली आणि त्या जागेचं रूपही बदलत गेलं. चौसोपी वाड्यात प्रवेश केला, की ओसऱ्यांवर गाद्यांची बिछायत असे. त्यावर थोरले लक्के आणि त्यांवर पांढरेशुभ्र अभ्रे चढवलेले असत. त्यांवर निळ्या दोऱ्यानं ‘शुभलाभ’चं भरतकाम आणि लाल दोऱ्यानं स्वस्तिक रेखलेलं असे. कपड्याच्या दुकानांत तर उशा-तक्क्यांवर ओला कुंकवाची पाच बोटंसुद्धा उमटवलेली असत.

मुख्य दरवाजा उघडला, की समोरच्या भिंतीवर छानसं चित्र किंवा एक-दोनच मोठ्या शोभेच्या वस्तू असाव्यात. उदा. कोरीव लाकडी कमानीत बसवलेलं चित्र किंवा आरसे. पुराणकथेतील महाकाव्यांतील प्रसंग कोरलेला असेल, अशी लाकडी पाटी असेल, तर ही दर्शनी भिंत सुंदर होते. आयताकृती किंवा आणि चौकोनी फ्रेम्स असलेला चित्रांचा कोलाजही या भिंतीवर छान दिसतो. तंजावर, म्हैसूर शैलीतील देवदेवतांची चित्रं हाही एक सुंदर पर्याय आहे.

हा असा कोलाज लावून जमिनीलगत एक लाकडी ड्रंक ठेवली, की या रचनेला पूर्णत्व येते. अर्थात हॉल जर मध्यम आकाराचा असेल, तर जमिनीलगत मोठ्या वस्तू ठेवण्यापेक्षा एक साधा शेल्फ करून त्यावर जुन्या पितळी आणि लाकडी वस्तू ठेवता येतील.

दिवाणखान्यातील प्रत्येक भिंतीवर काही ना काही लावलेलं असावं, असा नियम नाही, हे लक्षात घ्यावं. त्याच्या आकारमानाप्रमाणे ‘ज्या’ भिंतींवर अधिक लक्ष जातं, तिथंच कलाकृतींचं स्थान असावं, स्वयंपाकघराकडे किंवा शयनगृहाकडे असलेल्या हॉलच्या बाजूची भिंत लहान असू शकते. अशा कमी रुंदीच्या भिंतीवर लहानसे लाकडी स्टँड्स लावून त्यांवर मेणबत्यांच्या बरण्या ठेवल्या, तरी ती भिंत सजते. एखादं चित्रही लावता येईल.

हल्ली मोबाईलमध्येच वेळ पाहण्याची सवय आपल्याला जडली आहे. मनगटी घड्याळांकडेसुद्धा लक्ष जात नाही. असं असलं, तरी दिवाणखान्यातील भिंतीवर घड्याळ असावंच. गोऱ्या साहेबांची देण असलेली ‘आजोबा’ घड्याळं दिसायला छान असतातच; पण त्यांचं भिंतीवर असणं म्हणजे मूर्तिमंत चैतन्य. लंबकांची गती, दर अर्ध्या एक तासानं पडणारे टोल, त्याचा घरभर घुमणारा आवाज घराला हसरं नाचरं करतो. दिवाणखान्यात शक्यतो टेलिव्हिजन सेट लावू नये.

एका संपूर्ण भिंतीचं सौंदर्य नष्ट होतं. इतरत्र जागा नसेल आणि घरातली माणसं टीव्हीप्रेमी असतील, तर नाईलाज होतो अशा स्थितीत, घरातल्या सगळ्यात रुंद भिंतीवर तो लावावा. प्रचंड टीव्ही युनिट करण्यापेक्षा कामापुरतं एक शेल्फ करणं उत्तम. जागा भरपूर असेल, तर रत्तनच्या जाळीचे दरवाजे असलेलं बसकं (साधारणपणे दीड फूट उंचीचे) रुंद कपाट ठेवून त्यावर पुस्तकं, अँटिक्स ठेवता येतील. लहानशी सिरॅमिक फुलदाणीही छान दिसेल.

हल्ली हॉलमध्ये जेवणाचं टेबल ठेवलं जातं. अगदीच गरज असेल, तर पार्टीशन करावं. त्यासाठी लाकूड, काच, हातमागावर विणलेलं कापड, पितळी फुलं, परड्या यांचा सुयोग्य वापर करता येतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.