स्थळ : मंगळ ग्रह, (पुण्याच्या पलिकडे)
वेळ : दु. १ ते ४.
नअस्कार! मार्शियन भाषेत राकसामान! NAMASKAR चं उलटं स्पेलिंग केलं की RAKSAMAN होतं. ही विश्वातली एक अतिप्राचीन भाषा आहे, इंग्रजीचं स्पेलिंग उलटं करणं ही एक लिप्यंतराची सोय आहे. एरवी ही भाषा मराठीतच बोलली जाते. असो.
मंगळ ग्रहाचे भाषा मंत्री यदु तानामास घाईघाईने मंगळाधीश आर्दनेवेद सिवनडाफ यांच्या दालनात शिरले, आणि म्हणाले, ‘साहेब, जय मंगळ, पृथ्वीतलावर काहीतरी जबरदस्त घडामोड घडतेय, असा आयबीचा रिपोर्ट आहे.’ (मंगळावरही आयबीला आयबीच म्हणतात.)
‘ते तुम्ही मला काय सांगता? आयबी मलाच रिपोर्ट करते, होम डिपार्टमेंट माझ्याकडेच आहे,’ मंगळाधीश म्हणाले. मंगळाधीश हे फार धोरणी नेते समजले जातात. मध्यंतरी त्यांना कडक मंगळाचा त्रास झाला होता, पण ते(ही) पुन्हा (सत्तेवर) आले!!
‘पृथ्वीवरच्या एनुप शहरातून खबर आहे,’ यदु तानामास दाढी खाजवत म्हणाले.
‘एनुप? व्वा, ते तर विद्येचं माहेरघर! तिथून कसली खबर आहे?’ मंगळाधीशांनी विचारणा केली. एनुप शहराबद्दल मंगळाधीशांना आकर्षण होते, पण ते मूळचे मंगळाच्या रुपगान भागातले!!
‘इथाराम भाषेचं विश्व संमेलन भरलंय तिथं!,’ यदु तानामास म्हणाले. त्यांच्या बोलण्यात किंचित कुत्सित भाव होता. ते मंगळाच्या नाकोक भागातले होते…
‘हॅ:, इथाराम तुमच्यासाठी बे, तिथं ती मराठी भाषा म्हणून ओळखली जाते, तिला आता अभिजात दर्जा मिळालाय!,’ मंगळाधीशांची माहिती अपटुडेट असते, असं सगळेच म्हणतात. त्याचा मासला त्यांनी यदु तानामासांना दिला. पूर्वी काही काळ त्यांनी गुप्तपणे वेषांतर वगैरे करुन पृथ्वीवर एलियन म्हणून चकरा मारल्या होत्या.
‘तेच ते… पण कोण कुठल्या पृथ्वीग्रहावरच्या मागास मानव जमातीच्या एका प्रांतिक टोळीनं आपल्या भाषेचं विश्व संमेलन भरवावं, हे धाडसाचं नव्हे काय?,’ यदु तानाहास तावातावाने म्हणाले. त्यावर मंगळाधीश सिवनडाफ हुहुहु असे छद्मी का काय म्हंटात, तसे हसले. पृथ्वीवर माणसे खोखो हसतात, मंगळावर हुहुहु असे हसतात. पुन्हा असो.
‘मराठी ही अभिजात भाषा आहे, आणि ती अभिजात होण्याच्या आधीपासूनच वैश्विक आहे, हे वैश्विक सत्य तुम्हाला ठाऊक नसावं?,’ एक मोठा उसासा टाकत सिवनडाफ म्हणाले.
‘अशानं इथाराम…आय मीन, मराठी भाषेचा भयंकर प्रचार आणि प्रसार अखिल विश्वात झाला तर उद्या अशी वेळ येईल की मंगळी भाषा कुणी बोलणारा उरणार नाही!’ यदु तानामास यांनी चिंता व्यक्त केली.
मंगळी भाषेचं पुनरुज्जीवन व्हायला हवं, म्हणून यदु तानामास यांनी अनेक उद्योग केले. ते मंगळावरचे उद्योग मंत्रीही होते, हा भाग अलाहिदा! पण मराठी भाषेचा उद्योग तुम्हाला सांगितला कोणी? असे त्यांना विचारणे दुरापास्त होते. असो, असो.
‘मराठीचीही हीच रडकथा आहे, तानामासजी! एनुप शहरातसुध्दा कुणी धड मराठी बोलत नाही!’ सिवनडाफ हसून म्हणाले, मग थोडं थांबून त्यांनी वस्तुस्थितीनिदर्शक विधान केलं, ‘‘हल्ली तिथं सगळे पैशाची भाषा बोलतात!’
‘थोडक्यात, एनुप शहरातल्या मराठी विश्व संमेलनाचा विश्वाला काहीही धोका नाही, असं मी समजू ना? निदान आपलं ग्रहमंडळ तरी सुरक्षित राहील ना?’ यदु तानामास यांनी विनम्रतेनं विचारलं.
‘अगदी नि:शंक रहा! सरकारी कार्यक्रमांनी मराठी कधी सुधारली नाही, आणि बिघडलीही नाही! डोण्ट वरी!’ पुढ्यातल्या प्लेटीतला, फक्त मंगळावर पिकणारा लाल पेरु उचलत सिवनडाफ यांनी दिलासा दिला.
मराठी भाषा चिरायु होवो! मराठी भाषा वैश्विक होवो!!