मुंबई: बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची सफारी सुरु केली जाणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली. या उद्यानातील दोन सिंह वर्षभरासाठी दत्तक घेतल्याचेही त्यांनी जाहीर केले. ॲड. शेलार यांनी आज बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा पाहणी दौरा केला.
यावेळी मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन आदी उपस्थित होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सध्या वाघ आणि सिंहाच्या दोन सफारी उपलब्ध आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागात बिबट्यांचे सापडलेले बछडे याच उद्यानात संरक्षित करण्यात आलेले आहेत. त्यांचे पालन करण्यात येत आहे.
मात्र पर्यटकांना पाहण्यासाठी त्यांची सफारी उपलब्ध नाही. त्यासाठी सुमारे ३० हेक्टर जागा लागणार असून ही जागा या क्षेत्रात उपलब्ध आहे तर प्रकल्पासाठी सुमारे ५ कोटी खर्च अपेक्षित आहे. या राष्ट्रीय उद्यानाला वर्षभरात २० लाख पर्यटक भेट देतात. जर बिबट्याची सफारी उपलब्ध झाली तर पर्यटकांची संख्या वाढेल व त्यातून वनक्षेत्राचे उत्पन्न वाढेल, असे मुख्य वनरक्षक श्रीजी मल्लिकार्जुन यांनी सांगितले.
‘भारत’, ‘भारती’ला घेतले दत्तक!संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ‘भारत’ आणि ‘भारती’ हे तीन वर्षांचे दोन सिंह नुकतेच २६ जानेवारीला गुजरातमधून आणण्यात आले आहेत. त्यांना वर्षभरासाठी मंत्री ॲड.शेलार यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या पालनपोषणासाठी होणारा खर्च ते वैयक्तिकरित्या देणार असल्याचे सांगण्यात आले.