Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे पुण्यात भाकरी फिरवणार; पडद्यामागे जोरदार हालचाली, काहीतरी मोठं घडणार?
Saam TV February 01, 2025 05:45 AM

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षात इन्कमिंग देखील सुरुवात झाली आहे. एकीकडे शिंदे गटाकडून पुण्यासहित राज्यातील विविध भागात ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पाडणे सुरु केले आहे. यामुळे उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरे यांनी पुण्यात भाकरी फिरवणार असल्याचे संकेत दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुणे दौऱ्यावर येणार आहेत. उद्धव ठाकरे हे पुणे शहरातील सर्व शाखा प्रमुखांची बैठक घेणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची बैठक पुणे शहरात होणार आहे. उद्धव ठाकरे हे स्वत: शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाचा पुणे शहरातील आढावा घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबई महापालिका स्वबळावर लढवणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता पुणे महापालिकेबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

वसंत मोरे यांची संजय राऊत यांच्या विरोधात भूमिका?

पुण्यातील ठाकरे गटाचे नेते यांनी संजय राऊत यांच्या विरोधात भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. पुणे महानगरपालिका महाविकास आघाडी म्हणूनच लढली पाहिजे, असं वसंत मोरे यांचं म्हणणं आहे. महाविकास आघाडी म्हणून लढलो तर पुणे महापालिकेत शिवसेनेला 100 टक्के फायदा होईल, अशी मोरे यांची भूमिका आहे. मी महापालिका निवडणूक लढणार आहे. पुणे शहरात पक्षात नाराजी सुरू आहे, त्यावर पक्षश्रेष्ठी नक्की विचार करतील, अशी खात्री मोरे यांनी व्यक्त केली. तसेच वसंत मोरे यांच्या भूमिकेनंतर आता उद्धव ठाकरे त्यावर काय निर्णय घेणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.