अभिजीत देशमुख, साम टीव्ही
kalyan News : बेकादेशीररित्या भारतात वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींविरोधात कल्याण पोलीस उपायुक्तांनी दंड थोपटले आहेत . कल्याण-डोंबिवलीमधील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल व्यवसायिक ,लॉजिंग बोर्डिंग ,लेबर कॉन्ट्रॅक्टर,बिल्डर्स ,ठेकेदार, सोसायट्यांना संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांची कामगारांची माहिती पोलीस ठाण्याला देण्याच्या आदेश देण्यात आली आहे. माहिती लपवल्यास संबंधित ठिकाणी बांगलादेशी मजूर कामगार आढळल्यास संबंधित व्यावसायिक ,ठेकेदार ,सोसायटीविरोधात देखील कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराच पोलिसांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली परिसरात बांगलादेशहून भारतात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या घुसखोरांविरोधात विरोधात कारवाईने जोर धरला आहे. बेकायदेशीररित्या कल्याण डोंबिवलीत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची धरपकड सुरू आहे. हे बांगलादेशी नागरिक हॉटेल ,बार ,लॉजिंग बोर्डिंग तसेच लेबर कॉन्ट्रॅक्टर तसेच बांधकामाच्या ठिकाणी मोलमजुरी करत असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण परिमंडल ३ चे डीसीपी अतुल झेंडे हे ॲक्शन मोडवर आले आहेत.
आयुक्त कार्यालयातून मिळालेल्या निर्देशानुसार डीसीपी अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण डोंबिवलीमधील पोलीस स्टेशनमध्ये हॉटेल व्यवसायिक ,बार, लॉजिंग बोर्डिंग, बिल्डर, गृह संकुले, इतर मजूर कामगारांविषयी माहिती मिळवण्यासाठी संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
संबंधित व्यावसायिकांकडून परप्रांतीय मजूर वेगवेगळ्या कामाकरता कामासाठी ठेवले जात असतात. त्यामुळे संबंधित कामगार व मजुरांची माहिती म्हणजे त्यांचे नाव पत्ता, मूळ गावाचा पत्ता ,,रेशन कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र ,वाहन चालक परवाना, बँक पासबुक , भाडे तत्वावर राहत असल्यास भाडे करारनामा इत्यादी माहिती अदयावत ठेवावी.
तसेच सदर कामगाराची चारित्र्य पडताळणी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये करून घ्यावी अशी सूचना कल्याण डोंबिवली मधील विविध पोलीस ठाण्यातली अधिकाऱ्यांकडून संबंधितांना देण्यात येत आहे. तसेच ही माहिती न दिल्यास कोणताही अनुचित प्रकार घडल्यास ,कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित ठेकेदार हॉटेल चालक ,बार चालक, व्यावसायिक याला जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल असा सज्ज इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.