दुसऱ्या घटनेत आजरा-आंबोली मार्गावर आजरा बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून प्रज्वल ऊर्फ गणेश प्रकाश बापट (वय १६, रा. चाफवडे, ता. आजरा) या दहावीच्या मुलाचा मृत्यू झाला.
शिरगाव/आजरा : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातांत दहावीच्या दोन विद्यार्थ्यांचा (10th Students) दुर्दैवी मृत्यू झाला. राधानगरी (Radhanagari) तालुक्यातील शिरगाव व आजरा येथे या दुर्घटना घडल्या. अपघाताबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शिरगाव येथील अभिनव शरद गौड (वय १६, रा. शिरगाव, ता. ) हा आपल्या कामानिमित्त दुचाकीवरून नातेवाइकांकडे चालला होता.
शिरगाव, राशिवडे खुर्द, बेले ते पुंगावदरम्यान ‘मठाचे शेत’ नावाच्या मोरीच्या संरक्षक कठड्याला दुचाकीची जोरात धडक बसल्याने अभिनव गाडीवरून दूर फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
अभिनव हा सरवडे येथील किसनराव मोरे हायस्कूलमध्ये दहावीमध्ये शिकत होता. येथील श्री. गोपाळ बुवा व्यापारी मंडळाच्या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून त्याला श्रद्धांजली वाहिली. या घटनेची नोंद राधानगरी पोलिस ठाण्यात झाली असून, फिर्याद निखिल गौड यांनी राधानगरी पोलिस स्टेशनला दिली आहे. त्याच्या मागे आई, वडील, आजोबा असा परिवार आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल मोरे करत आहेत.
दुसऱ्या घटनेत आजरा-आंबोली मार्गावर आजरा बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून प्रज्वल ऊर्फ गणेश प्रकाश बापट (वय १६, रा. चाफवडे, ता. आजरा) या दहावीच्या मुलाचा मृत्यू झाला. आज सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला अपघात घडला आहे. आजरा पोलिसांत रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.
शुक्रवारी आजऱ्याचा आठवडी बाजार होता. आठवडी बाजाराचे साहित्य खरेदीसाठी प्रज्वल दुचाकीवरून गेला होता. प्रज्वल हा वाहनाची बाजू देताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली आला. त्याच्या डोक्यावरून चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. त्याच्या मागे आई, लहान भाऊ असा परिवार आहे. तो येथील व्यंकटराव हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होता. प्रज्वलच्या मृत्यूने चाफवडे गावात हळहळ व्यक्त होत आहे.