Ratnagiri guardian minister nitesh rane launches campaign kankavali
Marathi February 02, 2025 05:25 PM


सिंधुदुर्ग : पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नद्यांची पात्रे गाळमुक्त होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह रोखला जाऊन नदीकाठच्या गावांना पुराचा धोका संभावतो. म्हणून जिल्ह्यात नदीतील गाळ काढण्याची मोहिम राबविणे आवश्यक आहे. आज वरवडे येथे या मोहिमेचा शुभारंभ झाला असून 15 मे पर्यंत टप्याटप्याने जिल्ह्यातील नद्या गाळमुक्त करणार असल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले. कणकवली तालुक्यातील जानवली येथील चव्हाण दुकान ते वरवडे गड नदी संगमापर्यंतच्या गाळ काढण्याच्या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झाली. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर, तहसिलदार दिक्षांत देशपांडे उपस्थित होते. (Ratnagiri guardian minister nitesh rane launches campaign kankavali)

हेही वाचा : Budget 2025 : एकट्या ऋषभ पंतला भरावे लागणार 8 कोटी रूपये, नव्या करणप्रणालीचा ‘IPL’वर असाही परिणाम 

पालकमंत्री म्हणाले, नदी मधील गाळ काढण्याचा शुभारंभ आज झाला आहे. टप्याटप्याने सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली ते बांदा तेरेखोल नदी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर कुडाळ आणि पिठढवळ नदी क्षेत्रातील ख्रिश्चनवाडी अशा परिसरातील गाळ उपसा करुन नद्या गाळमुक्त करण्यात येणार आहेत. हे ठिकाण आम्ही पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनशिपच्या माध्यमातून निवडलेले आहेत. बांधकाम व्यावसायिक संघटना क्रेडाई आणि बांदा येथील काही व्यावसायिक आहेत जे या कामात सहभाग घेणार आहेत. जिल्ह्यातील गाळ काढण्याचे काम 15 मे पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी देण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात ज्या गावांमधून निवेदन प्राप्त होतील त्या गावात ही मोहिम राबविण्यात येईल असेही ते म्हणाले.

नदीतून काढलेल्या गाळाविषयी बोलतांना ते म्हणाले, आपल्या जिल्ह्यामध्ये रस्त्यांची अनेक कामे सुरू आहेत. काढलेला गाळ रस्त्याच्या कामासाठी वापरण्याबाबत संबंधित कंत्राटदारांशी तसेच क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या संस्थेशी बोलणे सुरु आहे. त्यांच्या प्रकल्पांसाठी आपण काढलेला गाळ उपयोगी ठरणार आहे. परिणामी काढलेल्या गाळाच्या दुर्गंधीचा सामना सामान्य जनतेला करावा लागणार नाही आणि काढलेल्या गाळाची योग्य प्रकारे विल्हेवाट लागणार असल्याचेही ते म्हणाले.


Edited by Abhijeet Jadhav



Source link

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.