सचिन कदम
रायगड : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मुलीचा मृत्यू हा चुकीच्या औषधोपचारामुळे झाल्याचा आरोप पालकांनी केला असून या प्रकरणी आता शाळेचे मुख्याध्यापक आणि अधिक्षक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. विद्यार्थिनी मृत्यू नेमका कशामुळे याचा तपास केला जात आहे.
जिल्ह्यातील पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आहे. या शाळेतील चौथीमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. खुशबू नामदेव ठाकरे असं या विद्यार्थिनीचे नाव आहे. शासनाच्या कुसुम योजने अंतर्गत शाळेत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले होते. या शिबिरात खुशबू हिला कुष्ठरोग झाल्याचे निदान झाल्याने तिला गोळ्या सुरू करण्यात आल्या होत्या.
कुष्ठरोगाचे निदान झाल्याने गोळ्या सुरु
दरम्यान या कुष्ठरोगाचे निदान झाल्यानंतर त्यावर गोळ्या सुरू झाल्यानंतर खुशबू हिला त्रास सुरू झाला. यामुळे तिच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याठिकाणी उपचार सुरु असताना खुशबू हिचा मृत्यू झाला. तिला कुष्ठरोग नव्हता असा तिच्या पालकांचा दावा आहे. दरम्यान मुलीचा मृत्यू हा चुकीच्या औषधोपचारामुळे झाल्याचे आरोप पालकांनी केला आहे.
मुख्याध्यापक, अधीक्षकांना करणे दाखवा नोटीस
दरम्यान चुकीचे औषधोपचार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांनी केला असून संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. आता या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधिक्षक यांना आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामध्ये विद्यार्थिनीच्या मृत्यू मागचे नेमके कारण काय? याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे.