Maharashtra Politics: पुण्यातही 'ऑपरेशन टायगर', ३ माजी आमदार शिवधनुष्य उचणार, दिवसही ठरला
Saam TV February 03, 2025 11:45 PM
अक्षय बडवे, पुणे

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ऑपरेश टायगर सुरू झाला आहे. ऑपरेशन टायगरचा एक अंक पुण्यात सुद्धा पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी ऑपरेशन टायगर सक्रीय झाले आहे.

पुण्यातील ३ माजी आमदार या महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात शिवसेनेत करणार प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. तीन माजी आमदारांसह आणखी ६ जणं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चांना उधाण आले होते. या ऑपरेशन टोलसमुळे महाविकास आघाडीतील अनेक पक्षांना गळती लागण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेत मोठं इनकमिंग पहायला मिळणार आहे. काँग्रेसचे २ नेते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ४ जणं एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात आहेत. शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीमध्ये असलेल्या पुण्यातील अनेकांची एकनाथ शिंदे यांच्यासह इतरांशी चर्चा आणि बैठका सुरू आहेत. यामुळे महाविकास आघाडीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसणार आहे.

एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असलेल्या नेत्यांची नावं देखील समोर आली आहेत. कसब्याचे काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर, हडपसरचे ठाकरे गटाचे माजी आमदार महादेव बाबर, कोथरूडचे ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, रत्नागिरीचे ठाकरे गटाचे माजी आमदार गणपत कदम, संगमेश्वरचे ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने, नवी मुंबईचे काँग्रेसचे माजी महापौर रमाकांत म्हात्रे हे सर्वजण शिंदेंच्या संपर्कात असून ते लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा होत आहे.

रत्नागिरीतील लांज्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला. यापूर्वी देखील लांज्यातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. लांजा - राजापूर मतदार संघ शत:प्रतिशत शिवसेना करण्याचा आमदार किरण सामंत यांचा निर्धार आहे. जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रांपंचायतीवर शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांचा हा मतदार संघ आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.