India vs England ODI: इंग्लंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. नुकतेच या दौऱ्यातील टी२० मालिका संपली असून आता वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. भारत आणि इंग्लंड संघात वनडे मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. याआधी टी२० मालिकेत भारतीय संघाने ४-१ अशा फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे.
यानंतर आता वनडे मालिकेतही वर्चस्व ठेवण्याचा आता भारताचा प्रयत्न असणार आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की भारताच्या टी२० संघातील बरेच खेळाडू वनडे संघाचा भाग नाहीत.
त्यामुळे जे खेळाडू वनडे मालिकेचा भाग नाहीत, ते खेळाडू आपापल्या घरी किंवा देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी परतले आहेत, तर वनडे मालिकेचा भाग असलेले खेळाडू नागपूरला पोहोचले आहेत.
काही महिन्यांपूर्वीच आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेले कोहली आणि रोहित शर्मा हे देखील नागपूरला पोहोचले आहे. भारत आणि इंग्लंड संघात नागपूरला वनडे मालिकेतील पहिला सामना खेळला जाणार आहे.
त्यामुळे वनडे संघातील विराट-रोहितसह श्रेयस अय्यर, शुभमन गिल, ऋषभ पंत, यशस्वी जैस्वाल असे बरेच खेळाडू रविवारी रात्री नागपूर येथे पोहोचले. त्यांचा व्हिडिओही समोर आला आहे.
या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेले सर्व खेळाडू आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळायला जाणाऱ्या संघातही आहेत, याला फक्त हर्षित राणा याचा अपवाद आहे. जसप्रीत बुमराह सध्या पूर्ण तंदुरुस्त नसल्याने हर्षित राणा याला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतील संघात संधी देण्यात आली आहे. बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात सामील आहे.
या वनडे मालिकेतील दुसरा सामना कटकला, तर तिसरा सामना अहमदाबादला खेळवला जाईल. १२ जानेवारीला भारत आणि इंग्लंड संघातील वनडे मालिका संपेल.
चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारीभारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी आगामी वनडे मालिका खूप महत्त्वाची आहे. कारण दोन्ही संघांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीआधीची ही शेवटची वनडे मालिका आहे. त्यामुळे या मालिकेतून दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अंतिम तयारी करतील.
मालिका संपल्यानंतर दोन्ही संघ लगेचच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रवाना होणार आहेत. इंग्लंड संघ पाकिस्तानला जाईल, तर भारतीय संघ दुबईला जाईल.
इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघरोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.
भारत विरुद्ध इंग्लंड वनडे मालिका (वेळ - दु. १.३० वाजता)६ फेब्रुवारी - पहिला वनडे, नागपूर
९ फेब्रुवारी - दुसरा वनडे, कटक
१२ फेब्रुवारी - तिसरा वनडे, अहमदाबाद