उद्या मतदान करून दिल्लीत मोहीम थांबली
Marathi February 04, 2025 10:24 AM

70जागांसाठी 699 उमेदवार रिंगणात : आप-भाजप-काँग्रेसमध्ये लढत, शनिवारी मतमोजणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी संध्याकाळी 5 वाजता थंडावल्या. 3 फेब्रुवारी हा दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेसाठी बुधवारी मतदान होणार असून शनिवारी मतमोजणी होणार आहे. 70 सदस्यांच्या दिल्ली विधानसभेसाठी एकूण 699 उमेदवार रिंगणात आहेत. नवी दिल्ली मतदारसंघात 23 आणि जनकपुरी मतदारसंघात 16 उमेदवार रिंगणात असल्यामुळे या दोन्ही जागांवर मतदानादरम्यान दोन मतदानयंत्रे वापरली जातील.

दिल्ली विधानसभा क्षेत्रात बुधवार, 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून तत्पूर्वी निवडणूक लढाईच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्व पक्षांनी आपले सर्व प्रयत्न केले आहेत. भाजपतर्फे पक्षाध्यक्ष जे. पी. न•ा यांनी बुराडी येथे तर अमित शहा यांनी नवी दिल्लीमध्ये प्रचारसभेला संबोधित केले. आम आदमी पक्षाच्यावतीने राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी दुपारी एक जाहीर सभा घेतल्यानंतर रोड शो मध्ये सहभाग घेतला. तसेच ज्येष्ठ आप नेते आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीदेखील शहरात अनेक जाहीर सभांना संबोधित केले. यापूर्वी रविवारीही आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजपने दिल्लीत प्रचारासाठी त्यांचे सर्व स्टार प्रचारक उतरवल्याचे दिसून आले. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जाहीर सभा, रॅली, रोड शो आणि मोर्चे काढून जनसंपर्क साधला. सोमवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही सर्व राजकीय पक्षांनी जोरदार प्रचार केला.

दिल्लीत मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी 1 लाखाहून अधिक कर्मचारी तैनात केले जातील. यामध्ये 35,000 दिल्ली पोलीस कर्मचारी, 19,000 होमगार्ड आणि 220 केंद्रीय सुरक्षा दलाच्या कंपन्या असतील. याशिवाय, दिल्ली सरकारच्या इतर विभागांचे सुरक्षा कर्मचारी देखील निवडणूक प्रक्रियेत योगदान देतील, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

मतदान केंद्रांची तयारी जोरात

दिल्लीत एकूण 13,766 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी 70 विशेष मतदान केंद्रे पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांद्वारे चालवली जातील, तर 70 केंद्रे दिव्यांग कर्मचाऱ्यांद्वारे व्यवस्थापित केली जातील. याशिवाय, तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी 70 विशेष मतदान केंद्रे देखील तयार करण्यात आली आहेत. दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या (सीईओ) आकडेवारीनुसार, 1.56 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत. त्यापैकी 83.76 लाख पुरुष, 72.36 लाख महिला आणि 1,267 तृतीयपंथीय मतदार आहेत.

केजरीवाल, आतिशींच्या निकालाकडे देशाचे लक्ष

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या फडात केजरीवाल आणि आतिशी या दोघांच्याही मतदारसंघातील निकालाची देशभर उत्सुकता आहे. केजरीवाल नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. भाजपचे प्रवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित हे केजरीवाल यांच्याविरुद्ध जोरदार दावा करत आहेत. त्याचवेळी, मुख्यमंत्री आतिशी ह्या कालकाजी विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांची लढत भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी आणि काँग्रेसच्या अलका लांबा यांच्याशी होत आहे. मुख्यमंत्री आतिशी यांनी 2020 मध्ये पहिल्यांदाच कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. ही जागा आतिशीने जिंकली होती.

राजकीय ‘चिखलफेक’

2013 पर्यंत 15 वर्षे राष्ट्रीय राजधानीत सत्तेत असलेल्या काँग्रेसला गेल्या दोन निवडणुकांमध्ये एकही जागा जिंकता आलेली नाही. त्यामुळे ह्या निवडणुकीत पुन्हा एकदा मोठी झेप घेण्यासाठी काँग्रेसने जोरदार प्रचार केला. आपने भाजपला ‘भारतीय झूट पार्टी’ आणि ‘गैरवापर पार्टी’ असे संबोधले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आप’ला ‘आप-दा’ आणि त्यांचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना ‘घोषणा मंत्री’ असे संबोधून प्रत्युत्तर दिले. दिल्लीच्या राजकारणात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसने केजरीवालांसाठी ‘बनावट’ आणि मोदींसाठी ‘स्मॉल रिचार्ज‘ असे शब्द वापरले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.