टाकळी ढोकेश्वर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांना भौतिक सुविधा मिळतात का, याची पाहणी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पारनेर न्यायालयातील न्यायाधीशांच्या त्रिसमितीय समितीकडून तालुक्यातील ३०९ प्राथमिक शाळांची तपासणी सुरू आहे.
शाळेची इमारत, क्रीडा सुविधा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वैद्यकीय कक्ष, स्वच्छता सुविधा आणि संगणक प्रयोगशाळा यांसारख्या सुविधा मिळाल्यास विद्यार्थ्यांचा मानसीक विकास होतो. त्यामुळे प्राथमिक शाळांतील बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायद्यानुसार व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या सुविधा मिळतात की नाही, याची तपासणी केली जात आहे. २२ जानेवारीपासून या न्यायाधीशांच्या समितीकडून या भौतिक सुविधांची तपासणी केली आहे.
तालुक्यात एकूण ३२७ जिल्हा प्राथमिक शाळा आहेत. यापैकी १८ शाळांची या अगोदर जिल्हा न्यायाधीश यांच्याकडून भौतिक सोयी सुविधांसंदर्भात तपासणी करण्यात आलेली आहे. उर्वरित ३०९ प्राथमिक शाळांची या त्रिसमितीय समितीकडून केंद्रनिहाय तपासणी केली जात आहे.
या सुविधांची होणार तपासणीया प्राथमिक शाळांतील वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, स्वच्छतागृहे, खेळाचे मैदान, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत सुविधा, वैद्यकीय कक्ष यांची पाहणी व तपासणी केली जाणार आहे.