बोधेगाव मंदिरातील सेवेकऱ्याचा मारेकरी कोण? संशियत ताब्यात; गुणरत्न सदावर्तेंचा संताप
Marathi February 04, 2025 10:24 PM

अहिलीनगर: जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पहिलवान वस्तीवरील पहिलवान बाबा मंदिराचे सेवेकरी नामदेव दहातोंडे यांची हत्या करण्यात आली. 70 वर्षीय नामदेव दहातोंडे गेल्या पंधरा वर्षापासून हे पहिलवान बाबा मंदिराची साफसफाई करीत होते. मात्र त्यांच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नामदेव दहातोंडे हे 26 जानेवारीपासून बेपत्ता झाले होते. याबाबत पहिलवानबाबा मंदिरातील पुजारी एकनाथ घोरतळे यांनी पोलिसात (Police) तक्रार देखील दाखल केली होती. मात्र, त्यांची शोधा-शोध करून देखील ते मिळून आले नाहीत. 31 जानेवारी रोजी मंदिर काहीतरी सडलेला वास येत असल्याने नागरिकांनी तिथे जाऊन पाहिले असता मंदिरामागील विहिरीत धड नसलेले शीर पाण्यावर तरंगताना आढळून आले. मात्र, धड सापडत नसल्याने पोलीस त्याचा शोधाशोध करीत असता मंदिरापासून काही अंतरावरील एका विहिरीतून सडलेल्या अवस्थेत वास येत असल्याचे निदर्शनास आल्याने विहिरीत पुरलेल्या अवस्थेत धड दिसून आले.

पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकऱ्याच्या हत्येच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे , उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळी भेट घेऊन पुढील तपासाचे आदेश दिले आहे. मात्र, स्थानिक शेवगाव पोलिसांनी मृत दहातोंडे यांच्या कुटुंबीयांची अवहेलना केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मृत दहातोंडे यांचे शीर ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले असता स्थानिक शेवगाव पोलिसांना पंचनामा करण्याचाच विसर पडला होता. त्यामुळे, मृत दहातोंडे यांच्या मुलासह ग्रामीण रुग्णालयात गेलेले शेवगाव पोलीस मुलाला घेऊन पुन्हा घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आलंय. सोबतच स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दहातोंडे कुटुंबीयांची साधी भेट देखील घेतली नसल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

शेजारील मंदिरातील पुजारी ताब्यात

दरम्यान, 2024 साली पहिलवान बाबा मंदिरातील मूर्तीची विटंबना झाली होती, त्याबाबत मृत नामदेव दहातोंडे यांनी शेजारीच असलेल्या मंदिरातील पुजारी कैलास काशीद याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. त्याच रागातून काशीद याने ही हत्या केली असावी असा संशय पोलिसांना आहे. त्यावरुन, पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. मात्र, एवढ्या क्रूर पद्धतीने हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या हत्येतील दोषींना कठोरातील कठोर शासन करण्याची मागणी पीडित कुटुंबीयांकडून होत आहे.

गुणरत्न सदावर्तेंचा संताप

या घटनेबाबत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना स्थानिक आमदार, खासदार यांचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. एकीकडे परभणी, बीड प्रकरणामुळे राज्यभर वातावरण तापलेले असताना दुसरीकडे नामदेव दहातोंडे यांच्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीचा निर्घृण खून होतो आणि त्याबाबत कुणीही बोलत नाही, असे सदावर्ते यांनी म्हटले. सदावर्ते यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे, तर शेवगाव पोलिसांच्या भूमिकेवरूनही स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे, येत्या काळात या हत्येवरून चांगलेच राजकारण तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

BMC Budget: मुंबईकरांना महापालिकेच्या बजेटमधून काय मिळणार? एका क्लिकवर 8 मुद्दे

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.